जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल… चंद्रकांत पाटलांची ऊर्जा मंत्र्यांवर टीका

मुंबई नगरी टीम

मुंबई : “राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत जनतेला शॉक द्यायची तुम्हाला सवय आहे, मात्र जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल. जनता सर्व काही बघतेय”, अशी टीका भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे. आधीच कोरोनामुळे त्रासलेल्या जतेला वाढीव वीज बिलांचा चटका देखील सहन करावा लागत आहे. या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटलांनी ट्विट करत एक निवेदनच प्रसिद्ध केले आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले? “आज एक बातमी वाचली की राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणत आहेत. “वीज बिलं वाढलेली नाही, लोकांचा तसा समज झालाय.” हे वाचून महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी अत्यंत वाईत वाटले. हे जोडून तोडून तयार झालेले तिघाडी सरकार संपूर्णपणे नागरिकांप्रती असलेली आपली जबाबदारी विसरली आहे. ऊर्जा मंत्री कदाचित परवा तुम्ही हे वाचले नसेल की आपल्याच सरकारशी जोडलेले वसई-विरारचे आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना जे ५.५ लाख रुपये विजेचे बील आले आहे ते भरण्यास त्यांनी नकार दिला. आश्चर्याची बाब म्हणजे हे बिल त्यांना बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालयाचे आले आहे.

तसेच वसई-विरार मधील नागरिकांना हितेंद्र ठाकूर यांनी आवाहन केले आहे की, कोणीही असे चुकीचे वीज बिल भरू नका. नागपूर मध्ये एका इसमाने ४० हजार रुपये विजेचे बिल भरण्यास असमर्थ असल्याने दुर्दैवाने आत्महत्या केली.ही संपूर्ण शासन आणि प्रशासनासाठी लज्जास्पद आणि खेदजनक घटना होती. त्यांच्या कुटुंबाने विजेचे बिल कमी करण्याची विनंती देखील केली होती. परंतु काहीच उपयोग झाला नाही त्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागले. मंत्री मोहोदय, मी आपल्याला परत सांगू इच्छितो की ग्राहकांना शॉक देणे बंद करा. जनतेने मोदी जी यांच्यावर विश्वास ठेऊन काँग्रेस आणि राहुल गांधींना जो शॉक दिला आहे तो विसरू नका. येत्या काळात तो तुम्हाला परत महाराष्ट्रात नक्कीच अनुभवायला मिळेल.”

Previous articleसुशांत सिंह आत्महत्या प्रकरण : राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वादग्रस्त विधानाने खळबळ
Next articleप्रविण दरेकरांचा आदित्य ठाकरे यांच्या नियुक्तीवर आक्षेप