मुंबई नगरी टीम
अहमदनगर : ज्यांनी पाच वर्ष राज्याचे गृह खाते सांभाळले त्यांचाच सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. तसंच हे दुर्दैवी असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे. आज अहमदनगरला पार पडलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
“सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर त्यांना बिहारच्या निवडणुकीसाठी प्रभारी पद देण्यात आले. हे सर्व राजकारण आहे. ज्यांनी स्वतः गृहखाते सांभाळले तेच पोलिसांवर संशय व्यक्त करत आहेत हे दुर्दैवी आहे”, असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. भाजपकडून सुशांतचे प्रकरण उचलून धरलेले असताना देवेंद्र फडणवीस यांना प्रभारीपदासारखी महत्त्वाची जबाबदारी मिळणे हा निव्वळ योगायोगच, अशी उपहासात्मक टीका सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केली जात आहे.
दरम्यान हसन मुश्रीफ यांनी यावेळी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिवर देखील भाष्य केले. “कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो रोखणे आणि मृत्यूदर कमी करणे हे आपल्या समोरील आव्हान आहे. शिवाय अत्यवस्थ रुग्णांसाठी तत्काळ बेड मिळतील अशी व्यवस्था करणे, जास्तीत जास्त रुग्णांना बरे करणे ही देखील आव्हाने असून यासाठी काम सुरू” असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.