मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्याच्या विविध विभागांमध्ये अधिका-यांच्या झालेल्या बदल्यांच्या प्रकरणावरून भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात एका नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असे सांगत त्याचे नाव ट्रान्सफर मंत्रालय आहे, असा टोला चंद्रकात पाटील यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी १५ टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठीकाणी मर्जीतील अधिका-यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत म्हटले की, “महाराष्ट्रात एका नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. नाव – ट्रान्सफर मंत्रालय, मंत्री – कोणी एक दोन नाहीत, तर अनेक… या मंत्रालयाचं बजेट नाही.. टार्गेट असतं”, असे ट्वीट त्यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी बदली प्रकरणाचा हा मुद्दा लावून धरत सरकारला लक्ष्य केले आहे. तसेच या प्रकरणी सीआयडी चाैकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी काही दिवसांपूर्वी केली. तर, असे न झाल्यास न्यायालयात दाद मागू असा इशारा चंद्रकात पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे दिला आहे.
दरम्यान, चंद्रकात पाटलांच्या या आरोपावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुरावे द्या, असे म्हटले. या संदर्भातील पुरावे द्या, कारवाई करू, असा पलटवार टोपेंना केला होता. त्यामुळे या बदली प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.