राज्यात कोरोनाच्या नावावर झोल, मनसेकडून पोलखोल

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात कोरोनाच्या नावाखाली मुंबई महापालिकेकडून भ्रष्टाचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. महापालिकेचा हा भ्रष्टाचार उघड्यावर आणण्यासाठी मनसेने आज पत्रकार परिषद घेतली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या कार्यालयाचा दुरुपयोग करत स्वतःच्या मुलांना कोरोना संदर्भातील कंत्राट दिली असल्याचा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. मनसे नेते संदिप देशपांडे, नितिन सरदेसाई, संतोष धूरी यांनी ही पत्रकार परिषद घेत महापालिकेचा भ्रष्टाचाराचा कारभार चव्हाट्यावर आणला आहे.

“एकीकडे लोकांची सेवा करण्याचे नाटक करायचे, आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा, आपल्या लोकांना मागच्या दारांनी कामे मिळवून द्यायची. त्यातून मनपाचे पैसे लाटायचे”, असे म्हणत संदिप देशपांडे यांनी यावर तीव्र निषेध नोंदवला आहे. महापाैरांनी आपल्या मुलांना कोविड आणि जम्बो सेंटरचे कंत्राट मिळवून दिली. पात्रता नसतानाही मुलांना कामे देण्यात आली. कोरोना सेंटरच्या उभारणीत भ्रष्टाचार झाला असून पडताळणी न करता कामे दिली असल्याचा आरोप, देशपांडे यांनी केला आहे. तसेच “किश कारपोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कोणताही अनुभव नसताना कोरोना सेंटर उभरणीची कामे देण्यात आली. याच्या संचालकपदी साईप्रसाद किशोरी पेडणेकर, गिरीश रमेश रेवणेकर, प्रशांत महेश गवस, शैला प्रशांत गवस आदिंची नावे आहेत. कोरोना काळात राजकारण करू नका, असे आवहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले होते. मात्र त्यांच्याच पक्षाकडून पालिकेत मोठा भ्रष्टाचार केला जात आहे”, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणी आमचे आमदार अधिवेशनात आवाज उठवणार आहेत. तर मनपाच्या लेखापालांसह मुख्यमंत्र्यांकडेही आम्ही तक्रार करणार असल्याचे मनसेकडून यावेळी सांगण्यात आले

Previous articleराज्यात नवे ‘ट्रान्फर मंत्रालय’,अधिका-यांच्या बदली प्रकरणी चंद्रकांत पाटलांचे सरकारवर टीकास्त्र
Next articleउत्तर प्रदेश पोलिसांनी रोखल्यानंतर नितीन राऊतांचे ठिय्या आंदोलन