नवाब मलिकांचा राजीनामा घेईपर्यंत कामकाज चालू देणार नाही; फडणवीसांचा इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदशी व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाठीशी घालत असून,कोणतीच यंत्रणा येथे सक्षमपणे राबवली जात नाही.भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे.संजय राठोड आणि अनिल देशमुख यांचा राजीनामा लगेच मंजूर होतो;पण दाऊदशी व्यवहार करणाऱ्यांना हे सरकार पाठीशी घालत एका विशिष्ट समाजाला गोंजारले जात आहे.असे असले तरी मुंबईकरांच्या मारेकरांना आम्ही सोडणार नाही, मालिकांचा राजीनामा घेत नाही तो पर्यंत आम्ही अर्थसंकल्‍पीय अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला किमंतच राहिलेली नाही.हे सरकार बेवड्याना समर्पित आहे असा सणसणीत टोलाही त्यांनी आघाडी सरकारला लगावला.मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच असे सांगून आम्हाला चर्चेत रस असल्याने सभागृहात अनेक मुद्दे मांडणार आणि चर्चा सुद्धा करणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज गुरूवारपासून सुरू होत आहे.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजपा आणि मित्र पक्षांची बैठक पार पडली.त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आशीष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.आजपासून सुरू होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.दाऊद इब्राहिम आणि अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे.देशात असे कधी घडले नाही असे सांगतानाच ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत,ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहत आहेत त्यामुळे नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच असा इशारा फडणवीस यांनी दिला.राज्यातील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या शब्दाला कोणतीही किंमत राहिलेली नाही.मागील दोन अधिवेशात अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या वीज जोडणी तोडणार नसल्याचा शब्द दिला होता. आता तर वीज जोडण्या तोडण्यासाठी कंत्राटदारांची स्पर्धा सुरू आहे. पिके वाळून, जळून जात आहेत.शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकरी हवालदील झाला आहे. त्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष नाही. राज्यात विजेचे सुलतानी संकट सुरू आहे त्याचाही जाब आम्ही विचारणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे.मागच्या तीन वर्षांत शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आल्याने तो नुकसानीच्या खाईत असताना शेतकऱ्यांची शेतीची वीज तोडली जात आहे. महात्मा फुले योजनेअंतर्गत अनुदान दिलेले नाही ओबीसी महाज्योती शिष्यवृत्तीचे पैसे दिले जात नाहीत. शिवाय सरकार मधील ओबीसी नेते महाज्योतीसाठी एक पैसाही मागत नाहीत. ही योजना सरकार बंद करण्याच्या मार्गावर आहे. पेसा आणि सामाजिक न्याय विभागात प्रचंड गैरकारभार सुरु आहे. कारकूनच साहेबांना लाच मागतो आहे.वाळू, दारू, खंडणी आणि भ्रष्टाचाराची परमसीमा या सरकारने गाठली आहे. राज्यात विविध समाजांचे प्रश्न आहेत,मराठा आरक्षणासाठी छत्रपतींना उपोषणाला बसायला लागते.आणि पुन्हा तीच आश्वासने सरकारने दिली आहेत.महाराष्ट्राची बारा कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे आणि ती तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असे सांगून,नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसतील तर हे दाऊद इब्राहिमला समर्पित सरकार आहे असे म्हणावे लागेल असेही फडणवीस यांनी सांगितले.

Previous articleमुख्यमंत्र्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही !
Next articleकितीही गोंधळ घालूदेत,नवाब मलिकांचा राजीनामा नाही म्हणजे नाही;जयंत पाटीलांनी ठणकावले