कितीही गोंधळ घालूदेत,नवाब मलिकांचा राजीनामा नाही म्हणजे नाही;जयंत पाटीलांनी ठणकावले

मुंबई नगरी टीम

मुंबई । जमीन व्यवहार प्रकरणी ईडीच्या अटकेत असणारे नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे तर विरोधकांनी कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज ठणकावून सांगितले.

उद्यापासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून,नवाब मलिकांचा राजीनामा घेईपर्यंत कामकाज चालू देणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.यासंदर्भात जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचा इरादा स्पष्ट केला.नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप भाजप करत राजीनाम्याची मागणी करत आहेत.खोटे-नाटे आरोप करायचे,गोंधळ करायचा आणि अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे असा टोलाही पाटील यांनी लगावला.विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात असे आवाहनही पाटील यांनी विरोधकांना केले आहे. शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे विशेष तपास पथकाच्या अहवालानुसार स्पष्ट होते.नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते. मात्र त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली असेही पाटील म्हणाले.या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Previous articleनवाब मलिकांचा राजीनामा घेईपर्यंत कामकाज चालू देणार नाही; फडणवीसांचा इशारा
Next articleभाजप-मविआमधिल आरोप प्रत्यारोपामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘वादळी’ ठरणार