शिंदे आणि फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार का करत नाही ? अजित पवारांनी सांगितले खरे कारण

मुंबई नगरी टीम

बारामती । राज्यात शिंदे -फडणवीस यांचे सरकार स्थापन होवून आता आठवडा होत आला असला तरी या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.भाजपसह शिंदे गटातील आमदारांना विस्ताराची प्रतिक्षा करावी लागत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात धाकधूक असल्यामुळेच या दोघांनी स्वत:चाच शपथविधी करून घेतला अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.विस्तार ११ तारखेनंतर करणार असल्याचे सांगत असल्याने पक्षांतरबंदीसंदर्भात काय निकाल लागेल याकडे पहावे लागेल असेही पवार म्हणाले.

शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे राज्यात सत्तापालट झाली.भाजप आणि शिंदे यांनी राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केल्यावर नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला.तेव्हा पासून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार त्यात कोणाला संधी मिळणार अशा चर्चा सुरू असतानाच आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीनंतर मंत्रीमंडळ विस्ताराविषयी चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले.त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे.शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर याचा आमच्याशी कसलाही संबंध नसल्याचे काही जण सांगत हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे असे बोलत होते.मात्र एका मुलाखतीत एका नेत्यांच्या पत्नीने माझा नवरा वेशभूषा बदलून अनेकदा इतरांना भेटायला जायचे असे सांगितले आहे.एकीकडे सांगायचे आमचा संबंध नाही.अशा गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात घडच नव्हत्या असे पवार यांनी सांगून,कुठे तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात धाकधूक असल्यामुळेच या दोघांनी स्वत:चाच शपथविधी करून घेतला अशी टोलेबाजी पवार यांनी बारामतीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केली.

Previous articleओबीसी आरक्षण : विरोधकांचा नव्या सरकारला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न तर पंकजाताई आशावादी
Next articleनगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलणार ?