मुंबई नगरी टीम
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी आता राजकारणातून देखील संशयाचा धूर निघत आहे. सुशांतचा मित्र संदीप सिंह याचे नावे या प्रकरणात येत आहे.संदीप सिंह याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक बनवला होता. त्यामुळे संदीपसिंह आणि भाजपचा संबंध असल्याचा आरोप काँग्रेससह अनेकांनी केला आहे.त्यामुळे या प्रकरणात भाजप अँगलनेही तपास करावा, अशी मागणी केली जात आहे.या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक बनवणारा संदीपसिंह आणि भाजप यांच्यातील संबंधांची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या अनेकांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत.त्याचा संबंध बॉलिवूड आणि ड्रग्स प्रकरणाशी देखील आहे.त्यामुळे या प्रकरणाची देखील चौकशी करण्याची विनंती मी सीबीआयकडे करणार, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातील ट्विट केले आहे.
सुशांत प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून संदीप सिंह याचे नाव चर्चेत आहे.असे असतानाच या प्रकरणात ड्रग्ज माफियांचे देखील कनेक्शन असल्याचे समोर आले आहे.त्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी बॉलिवूडमधील अंमली पदार्थांच्या रॅकेटची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.तर या मुद्द्यावरून भाजपने पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा संदीप सिंहबरोबरचा एक फोटो पोस्ट केला होता त्यामुळे या प्रकरणात भाजप अँगलनेही सरकारने तपास करावा,अशी मागणी केली होती.या मुद्द्यावरून आता भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे.