बॉलिवूड आणि भाजप नेत्यांमधील ड्रग्ज कनेक्शनचा तपास करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले. यामध्ये बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांची नावे देखील समोर आली. त्यामुळे या मुद्यावरून ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारे भाजप नेते आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने बॉलिवूड आणि भाजप नेत्यांचे ड्रग्ज कनेक्शन तपासाची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर एनसीबीला तक्रार करण्यात आली आहे. याबाबत एनसीबीने तपास केला नाही तर, चार ते पाच दिवसांत महाराष्ट्र पोलीस याचा तपास सुरू करतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला होता. तर काँग्रेसनेही ड्रग्ज प्रकरणी भाजप नेत्यांचा असणारा संबंध समोर आणला आहे. या प्रकरणी शुक्रवारी काँगेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दुसऱ्यांदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. याधीही सचिन सावंत यांनी केलेली तक्रार गृहमंत्र्यांनी एनसीबीकडे पाठवली होती. परंतु एनसीबीकडून आद्यपही यावर काहीच हालचाल झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे सचिन सावंत यांची दुसरी तक्रारही आपण एनसीबीकडे पाठवत आहोत. जर एनसीबीने याचा तपास केला नाही, तर पोलीस याचा तपास करतील, असे अनिल देशमुख म्हणाले.

ड्रग्ज कनेक्शनमधील चित्रपट निर्माता संदीप सिंह याचे भाजप नेत्यांशी असलेले संबंध. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये काम करणार अभिनेता विवेक ओबेरॉय यांचा ड्रग्ज कनेक्शनचा तपास करण्याची मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. ट्विटरदेखील त्यांनी याबाबत वारंवार भाष्य करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, एनसीबीकडून यावर काही तपास न झाल्यास पोलीस याचा तपास करतील, असेअनिल देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे भाजप नेत्यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची चिन्हे आहेत.

Previous articleमहिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी
Next articleठाकरे सरकारचा दिलासा : महिलांना उद्यापासून लोकलने प्रवास करण्याची मुभा