मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील मंदिरे खुली करण्याबाबत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.या पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीकडून पंढरपुरात आंदोलन पुकारण्यात आले.वंचितच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडीत काढला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निराशा व्यक्त करत विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली.
राज्य सरकार टप्प्याटप्प्याने गोष्टी सुरू करत आहेत.भविष्यात मंदिरे व रेल्वे सुरू करण्यासंदर्भात चर्चा होईल.विरोधी पक्षाने संयम बाळगला तर जनतेवर उपकार होतील.प्रकाश आंबेडकरांनी जी गर्दी जमवली आहे ते चित्र चांगले नाही.पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी सर्वच आसुसलेले आहेत. हजारो लोकांनी आंदोलनासाठी गर्दी केल्याने संक्रमण वाढू शकते. मुख्यमंत्र्यांनी हा धोके ओळखूनच ही परवानगी दिलेली नाही. आंबेडकर हे संयमी नेते आहेत. कायद्याचे जाणकार आहेत. आरोग्य विषयक आणीबाणी असताना अशा नेत्याकडून कायदेभंगाची,नियम भंगाची भाषा करणे लोंकाना हुसकावण्यासारखे आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, मंदिरे खुली करण्याचा मुद्दा दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. याच मुद्द्यावरुन शनिवारी भाजप व विविध संघटनांकडून राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. तर आज विश्व वारकरी सेवा आणि वंचिच बहुजन आघाडीने पंढरपुरातील विठ्ठल मंदिर खुले करण्याची मागणी करत आंदोलन पुकारले होते. राज्यात मॉल,दारू विक्रि सुरू केली जाते, मात्र मंदिरे खुली केली जात नाहीत, अशी टीका करत विरोधकांनी आपली मागणी लावून धरली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.