आमदार रोहित पवारांनी साधला मोदी सरकारवर निशाणा 

मुंबई नगरी टीम

अहमदनगर : ‘राज्यांना त्यांच्या हक्काचे जीएसटीचे पैसे देण्याऐवजी केंद्र सरकारने आता कोरोना सुरक्षा साधनांचा देखील पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याला जबाबदारी घेणे म्हणत नाही’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तसेच या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. रोहित पवार हे सोशल मिडियाच्या माध्यमातून नेहमीच आपले मत मांडत असतात. आता राज्यासह देश पातळीवरील मुद्द्यांवर देखील रोहित पवार आपले मत मांडताना दिसत आहेत.जीएसटीनंतर त्यांनी आता कोरोनाच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारच्या कामगिरीकडे बोट दाखवले आहे.

रोहित पवार याविषयी अधिक बोलताना म्हणाले, “आरोग्याचा वाढता खर्च भागवताना राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण येत आहे. अशातच आज सकाळी वृत्तपत्रात एक बातमी वाचायला मिळाली ती म्हणजे ‘आरटीपीसीआर टेस्ट किट’, पीपीई किट आणि एन-९५ मास्क याचा राज्यांना करण्यात येणारा पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हा निर्णय म्हणजे आधीच अडचणीत असलेल्या राज्यांची आणखी कोंडी करण्याचा प्रकार आहे. ही कोरोना प्रतिबंधक साधने आजपर्यंत केंद्र सरकारकडून राज्यांना पुरवण्यात येत होती. खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याने ही साधने केंद्राला कमी किंमतीतही मिळू शकतात. पण एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना या साधनांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला, हे चुकीचे आहे. सर्वच राज्ये आज संकटात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना त्यांचे हक्काचे जीएसटीचे पैसे देणे गरजेचे होते. पण ते देण्याऐवजी केंद्र सरकारने कर्ज घ्यायला सांगितले आणि आता तर कोरोना सुरक्षा साधनांचा पुरवठाही थांबवायचा निर्णय घेतला. याला जबाबदारी घेणे म्हणत नाहीत. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा”, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच जीएसटीच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही अशी टीका केली होती. तर भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवारांना नाॅलेज नाही, अशी अप्रत्यक्ष टीका केली होती. मात्र आता रोहित पवारांनी आरोग्याविषयी मुद्दा मांडत केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

Previous articleपंतप्रधान मोदींची “मन की बात” जनतेला खटकली,व्हिडीओवर पडला डिसलाईकचा पाऊस
Next articleमंदिर प्रश्नी संजय राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल