मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात सध्या धार्मिक स्थळे खुली करण्याचा मुद्दा तापलेला असताना आता रेस्टॉरंटस् खुली करण्याची मागणी देखील केली जात आहे. सहा महिने होऊनही राज्यातील रेस्टॉरंटस् अद्याप खुली झालेली नाहीत.त्यामुळे रेस्टॉरंटचा व्यवसाय अडचणीत सापडला असून त्याबाबत सहानुभूतीपुर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.महाराष्ट्र रेस्टॉरंट कल्बने यासंदर्भातील निवेदन सुप्रिया सुळेंना दिले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा,अशी विनंती सुप्रिया सुळे त्यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
आपल्या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील रेस्टॉरंटचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सध्या पार्सलची मुभा देण्यात आली असली तरी, यातून या उद्योगाला सावरण्यासाठी ती पुरेशी नाही. याशिवाय अनेक रेस्टॉरंटस् चालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना समोर जावे लागत आहे. या व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेता, रेस्टॉरंटस् सुरू होणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असणारे सोशल डिस्टन्सिंग आदीचे दिशानिर्देश देखील जारी करावेत. आपणास विनंती आहे की, कृपया या व्यावसायिकांच्या बाबातीत सहानुभूतीपुर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा”, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यात हॉटेल, रेस्टॉरंटस् बंद ठेवण्यात आले आहेत. त्याऐवजी पार्सल सुविधा देण्यात आली आहे. परंतु आता सहा महिने उलटले असून रेस्टॉरंटस् खुली करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र रेस्टॉरंटस् क्लबने केली आहे. रेस्टॉरंटस् सुरू ठेवण्याची वेळ वाढवून सायंकाळी १० पर्यंत करून मिळावी, कर्जाच्या थकबाकीत किमान ६ महिन्यांच्या व्याजात सूट मिळावी, टाळेबंदीच्या काळात आकरण्यात आलेल्या विजबीलात पूर्णतः सूट मिळावी. यासह अन्य काही मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.