मुंबई नगरी टीम
मुंबई : अभिनेत्री कंगना रणावत हीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावर संजय राऊत यांनी आपल्याला पोकळ धमकी देण्याची सवय नाही,आम्ही थेट कृती करतो,असे प्रत्युत्तर कंगनाला तिचे नाव न घेता दिले आहे. तसेच मुंबईचा अपमान सहन करणार नाही. मुंबई पोलिसांवर आरोप करणाऱ्या ऐऱ्यागैऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी देखील त्यांनी राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत बोलत होते.
यावर अधिक बोलताना ते म्हणाले, “मुंबईचे रक्षण सातत्याने आपल्या पोलिसांनी केले आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस शहीद झाले. कसाबला मुंबई पोलिसांनी पकडले. १९९२ च्या दंगलीत मुंबई पोलिस शहीद झाले. कोणतेही एैरेगैरे लोक ज्यांचा मुंबईशी संबध नाही ते मुंबई पोलिसांवर आरोप करत असतील तर, राज्य सरकारने,गृहमंत्रालयाने कठोर कारवाई केली पाहिजे”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. “आधी पीओके काय आहे ते बघू या मग बोला. माझा कोणावर व्यक्तीगत राग नाही. मी कोणाचेही नाव घेणार नाही. पण जर कोणी म्हणत असेल मी धमकी दिली तर, मी पोकळ धमकी देत नाही. ते माझे काम नाही. मी शिवसैनिक असून अॅक्शनवाला माणूस आहे. या ज्या मेंटल केसेस वाढल्या आहेत त्यावर आरोग्य खात्याने लक्ष घालावे”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान,यावेळी संजय राऊत यांनी भाजपचे नाव न घेता टीका केली आहे. मुंबईला पाकिस्तान म्हणणा-या प्रवृतींना पाठिंबा देणा-या राजकीय पक्षांना महाराष्ट्रात मत मागण्याचा अधिकार नाही. त्यांच्या भूमिकेविषयी त्या पक्षाकडून खुलासा होणे गरजेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी टीका करताना कंगनाने मुंबई पोलिसांसह थेट राजकीय नेत्यांनाही लक्ष्य केले आहे. तर दुसरीकडे कंगनाच्या अशा बेताल वक्तव्याला राज्यातील विरोधी पक्ष समर्थन करताना दिसत आहे. त्यामुळे आता हा वाद कोणते नवे वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.