मुंबई पोलिसांबद्दल जजमेंटल होऊन कुणीही पंगा घेऊ नका ! कंगनाला मनसेची तंबी

मुंबई नगरी टीम

मुंबई :  अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी वादग्रस्त टीका टिप्पणी करणारी अभिनेत्री कंगना राणावत भारीच चर्चेत आली आहे.तर तिची चर्चा केवळ चित्रपटसृष्टी पुरती मर्यादित नसून ती आता राजकारणात देखील केली जात आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने कंगनावर सर्वच स्तरातून टीकेचा भडीमार होत आहे. विशेषकरून मुंबईकर या विधानाने संतापलेले असतानाच मनसेने देखील कंगनाला आपल्या भाषेत तंबी दिली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून कंगनाला मुंबई पोलिसांबद्दल जजमेंटल होऊन कुणीही पंगा घेऊ नये,असे म्हणत चांगलेच सुणावले आहे.

“माझ्या मुंबई पोलिसांबद्दल जजमेंटल होऊन कुणीही पंगा घेऊ नये.मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्री सुद्धा कामावरून घरी बिनधास्तपणे जातात,याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस.आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे.कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो… कशाचीही  पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावे. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेले मीच काय,कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही,असे ट्वीट अमेय खोपकर यांनी केले आहे.

कंगनाने राणावत हीने एक ट्वीट केले आहे.ज्यामध्ये तीने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असल्याचा आरोप केला आहे. शिवाय मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे,असे ती म्हणाली. कंगनाच्या या ट्वीटनंतर बालिवूडसह मराठी कलाकारांनी देखील तीच्या या वक्तव्याचा विरोध केला आहे. तर आता मनसेने देखील कंगनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून हा वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे.

Previous articleधमकी देण्याची मला सवय नाही आम्ही थेट कृती करतो : संजय राऊतांचा कंगनाला इशारा
Next articleआता ७/१२ वर असणार प्रत्येक गावाचा युनिक कोड,वॉटर मार्क आणि शासनाचा लोगो