मोबाईल आणि उपकरणे विक्रेत्यांना ऑनलाईन विक्रीची परवानगी द्या : मनसेची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे.केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने येत्या १ मे पर्यंत बंद करण्यात आली आहेत.सध्याचे युग हे डिडिटलचे असल्याने टेलिकॅाम साधने,मोबाईल,मोबाईल उपकरणे, बॅटरी आदी वस्तू या दैनंदिन वापरासाठी आवश्यक बनले असल्याने या विक्रेत्यांना या वस्तू ऑनलाईन पद्धतीने विक्री करण्याची परवानगी देवून,या सेवेचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष सतिश नारकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत.राज्यातील कोरोनाचा कहर पाहता हा लॉकडाऊन हा येत्या १५ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.सर्वसामान्य विक्रेते यांच्यासह राज्यातील मोबाईल आणि संबंधित उपकरणांचा व्यवसाय ठप्प झाला झाला आहे. त्यामुळे सध्याच्या ऑनलाईनच्या जमान्यात टेलिकॉम साधने ही सर्वसामान्यांची आवश्यक साधने ठरली आहेत.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शिक्षण हे ऑनलाईनच्या माध्यमातून सुरू आहे.टेलिकॉम सेवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात मानवी जीवनाचा एक दैनंदिन भाग बनला आहे.यामध्ये कार्यालयीन व्यक्ती,विद्यार्थी,छोटे व्यवसायिक असे प्रत्येक जण डिजिटल विश्वाकडे आकर्षित झाला आहे.आज हॅण्डसेट किंवा लॅपटॉप,संगणकाशिवाय व्यक्ती काही तास वेगळे राहू शकत नाही.या संकटात वर्क फ्रॅाम होमच्या माध्यमातून अनेकांनी घरात राहून,घरातूनच काम करण्याचा मार्ग अवलंबला आहे.मोबाईल फोन,टॅबलेट,डोंगल,लॅपटॉप ई-मेल यासारख्या संदेशाचे आदान-प्रदान करणारे डिजिटल साधनेच नसतील तर टेलिकॉम नेटवर्क वापरण्याचा काय उपयोग ? असाही सवाल नारकर यांनी करून मोबाईल,उपकरणे विक्रेते,सॅाफ्टवेअर विक्रेते,स्टॅड,कर्व्हस बॅटरी पॅक,हेड फोन्स इत्यादी वस्तूंचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा अशी मागणी नारकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात ज्या पध्दतीने खाद्य पदार्थ विक्रेत्यांना होम डिलिव्हरीची परवानगी दिली आहे.त्याच पद्धतीने या व्यावसायिकांना होम डिलिव्हरीची परवानगी द्यावी अशी मागणी नारकर यांनी केली आहे.सरकारने या व्यावसायिकांना होम डिलिव्हरीची परवानगी दिल्याने सरकारने घालून दिलेल्या अटींचे पालन केले जाईल अशी ग्वाही दिली आहे.त्यामध्ये अभियंते,टेक्निशियन आणि वितरक एजंट यांना लसीचा पहिला डोस दिला जाईल.शिवाय ग्राहकांशी बोलताना वितरक हे दोन मास्कचा वापर करतील.सर्व सेवा शक्यतो स्थानिक सोसायटयांच्या लॉबीमध्ये पुरविल्या जातील.देयके स्वीकारताना शक्यतो गुगल पे,पेटीएम,अन्य वॉलेट्स,युपीआय व बॅक ट्रान्सफर या सारख्या स्पर्शहिन मार्गाने स्वीकारले जातील.सर्व संबंधित व्यक्ती सॅनिटायझरचा वापर करून वेळावेळी हात स्वच्छ धुतील,सामाजिक अंतराचे मानंदडाचे पालन करतील.त्यामुळे आमच्या मागणीचा योग्य विचार करून या व्यवसायाशी संबंधित असलेल्या कामगार व वितरक वर्गाचा उपजिविकेचा प्रश्न सोडवावा,अशी मागणी नारकर यांनी या पत्रात केली आहे.

Previous articleकोरोना विरूद्धच्या लढाईत काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी;केली मोठ्या मदतीची घोषणा
Next articleभाजी मार्केट आणि किराणा मालाची दुकाने दिवसभर खुली ठेवा : रामदास आठवलेंची मागणी