मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केली कोळीबांधवांची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । विकासकामे करताना भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे.मुंबईतील सागरी किनारा मार्गाचे काम करताना वरळी कोळीवाड्याजवळील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर ६० वरून १२० मीटर करण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याभागातील कोळीबांधवांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून अत्याधुनिक तंत्रज्ञान,मनुष्यबळाची संख्या वाढवून सागरी किनारा मार्ग प्रकल्प वेळेत पूर्ण करावा,असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल आणि कोळी बांधव उपस्थित होते. वरळी जवळून सागरी किनारा मार्ग सी लिंकला जोडला जात आहे. तेथील क्लीव्ह लॅण्ड बंदर जवळ दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या कनेक्टरचे काम सुरू असून त्या पिलर मधील अंतर वाढविण्याची मागणी स्थानिक कोळी बांधवांची होती. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी कोळीबांधवांची बैठक देखील घेतली होती. त्यामध्ये यामागणी बाबत तज्ञांची समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार सात सदस्यांची समिती नियुक्त केली होती. समितीने महिनाभरात अहवाल देत अंतर ६० वरून १२० मीटर करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोळीबांधवांची अंतर वाढविण्याची मागणी मान्य करीत या पिलरमधील अंतर १२० मीटर करण्याचा निर्णय जाहिर केला.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, कुठल्याही विकास प्रकल्पाला गती देताना स्थानिकांची नाराजी असू नये अशी आमची भूमिका आहे. आम्ही लोकहिताच्या निर्णयाला नेहमीच प्राधान्य देत आहोत. त्यानुसार कोळीबांधवांनी केलेल्या मागणीवर सकारात्मक विचार करून हा निर्णय घेतला आहे. पिलरमधील अंतर वाढवल्यानंतर कोळी बांधवांच्या बोटी त्याभागातून सहजपणे ये जा करू शकतील. कोळीबांधवांच्या हिताला प्राधान्य असल्याने दोन्ही पिलरमधील अंतर वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगतानाच प्रगत तंत्रज्ञान, अधिकचे मनुष्यबळ वापरून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी कोळीवाड्यांचे सीमांकन, पुनर्विकास आदीबाबत चर्चा झाली. कोळीवाड्यांचे सीमांकन लवकरच पूर्ण होईल, असे सांगत कोळीवाड्यांचे हक्क अबाधीत राहतील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Previous articleमहाविकास आघाडीचा महामोर्चा होणार म्हणजे होणारच ! अजित पवार आणि उद्धव ठाकरेंनी ठणकावले
Next articleहिवाळी अधिवेशन : वादग्रस्त वक्तव्य,सीमावाद,राज्याबाहेर गेलेले उद्योग,शेतक-यांचे मुद्दे गाजणार