हिवाळी अधिवेशन : वादग्रस्त वक्तव्य,सीमावाद,राज्याबाहेर गेलेले उद्योग,शेतक-यांचे मुद्दे गाजणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । येत्या सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये सुरू होत असून,दोन आठवडे चालणा-या या अधिवेशनात विरोधकांच्या भात्यात अनेक मुद्दे असल्याने हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे.भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वक्तव्य,सीमावाद,राज्याबाहेर गेलेले उद्योग,शेतक-यांना मिळालेली तुटपुंजी नुकसान भरपाई,विरोधी पक्षांच्या नेत्यांवर होणारी कारवाई, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हकालपट्टीची मागणी आदी मुद्दयावरून विरोधक सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षापासून नागपूरात होणारे हिवाळी अधिवेशन कोरोनाच्या संकटामुळे होवून शकले नाही.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे नागपूर मध्ये होणारे पहिले हिवाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली गेली आहेत.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील,भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी,आमदार प्रसाद लाड,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.त्यातच राज्यात येणारे महत्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही शेतक-यांना मिळालेली तुटपुंजी नुकसान भरपाई आदी मुद्दावरून येत्या सोमवारपासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात विरोधक शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केल्याने याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत.राज्यपालांची हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.मात्र यावर काहीच निर्णय झाला नसल्याने विरोधक पहिल्या दिवसापासून हा मुद्दा लावून धरण्याची शक्यता आहे.राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित करत छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिले होते असे वक्तव्य करीत विरोधकांना आयता मुद्दा दिल्याने यावरूनही दोन्ही सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे.वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात संतापाची लाट असतानाच पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा,आमदार प्रसाद लाड,मंत्री चंद्रकांत पाटील,केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद सभागृहात उमटण्याची शक्यता आहे.राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक होवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्याची शक्यता आहे.सीमावादावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसनराज बोम्मई यांनी केलेली वक्तव्य यावरूनही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच राज्यात येणारे वेदांता फॅास्कॅान,उर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प,टाटा एअरबस प्रकल्पासह सॅफ्रन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोधक सत्ताधा-यांना घेरण्याची शक्यता आहे.राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतक-यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने हा मुद्दाही अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच विरोधी पक्षांचे नेते चौकशीच्या फे-यात अडकले आहेत.ठाकरे गटाचे कोकणातील आमदार राजन साळवी आणि वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेली चौकशी आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करण्यात आलेली अटक यावरून ठाकरे गटाचे आमदार आक्रमक होण्याची शक्यता असल्याने नागपूर मध्ये होणारे दोन आठवड्याचे हिवाळी अधिवेशन गरमागरमीचे होवून शकते.विरोधकांच्या भात्यात अनेक मुद्दे असल्याने अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसात सभागृहात गदारोळ होवून कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केली कोळीबांधवांची मागणी
Next articleप्रभूरामाच्या नावावर स्वतःचे खिशे भरणाऱ्यांनी हिंदू देवदेवतांवर बोलू नये : नाना पटोलेंचा भाजपावर हल्लाबोल