उद्धव ठाकरे यांच्याकडे ब्रह्मास्त्रापेक्षा प्रभावी ‘टोमणेअस्त्र’ : देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई नगरी टीम

मुंबई । गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयाबद्दल अभिनंदन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असा टोला लगावला आहे.याचा समाचार घेताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजींजवळ अस्त्र आहे जे ब्रह्मास्त्रापेक्षा प्रभावी आहे.ते म्हणजे ‘टोमणेअस्त्र’टोमणे मारल्याशिवाय त्यांचे कुठले वाक्य पूर्ण होऊ शकत नाही असा हल्लाबोल त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक निकालानंतर सागर निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता.त्यांच्या या टीकेचा खरपूस समाचार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेत उद्धवजींजवळ अस्त्र आहे जे ब्रह्मास्त्रापेक्षा प्रभावी आहे.ते म्हणजे ‘टोमणेअस्त्र’टोमणे मारल्याशिवाय त्यांचे कुठले वाक्य पूर्ण होऊ शकत नाही असा हल्लाबोल त्यांनी केला.गुजरात मधिल विजयाबद्दल फडणवीस यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानून अभिनंदन केले.२७ वर्षे राज्य केल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात जनता जागा निवडून देते,याचा अर्थ गुजरातच्या जनतेला हा विश्वास आहे की गुजरातमध्ये जे परिवर्तन झाले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने केले. पुढेही भाजपाच गुजरातच्या हिताचे निर्णय करू शकते.मोदी यांच्या नेतृत्वातच देश पुढे जाऊ शकतो हा विश्वास गुजरातच्या जनतेने या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवलेला असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.

कॉंग्रेस आजपर्यंतच्या इतिहासातील १६ जागा या सर्वांत कमी जागा आहेत.ज्यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करीत आणि आम्ही निवडून येणार असे लेखी दिले,अशा आप नावाच्या पार्टीचे पुरते बारा वाजले. त्यामुळे आप दिल्लीपुरती मर्यादीत पार्टी असल्याचे गुजरातने दाखवून दिले आहे असेही ते म्हणाले.तेलशुद्धीकरण प्रकल्प हा देशातला सर्वात मोठ्या गुंतवणूकीचा प्रकल्प होता तो उद्धव ठाकरे यांनी बाहेर घालवला असे सांगून,मुंबई महानगरपालिकेवर भाजपा,बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष या आमच्या महायुतीचा झेंडा निश्चितपणे फडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.कर्मचा-यांचे पगार कर्नाटका बॅकेतून करण्याचा निर्णय हा अजित पवार यांच्या काळात घेतला असल्याचे फडणवीस यांनी सांगितेल.यावेळी फडणवीस यांनी सीमा प्रश्नावरही भाष्य केले.दोन राज्यात अशांतता पसरावी म्हणून काही लोक कार्यरत झालेले आहेत.मी स्वतः तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे.केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोललो आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या माध्यमातून कर्नाटकाशीही जे व्हायचे ते बोलणे झालेले आहे.दोन्ही राज्यांनी शांतता कुठेही कमी होऊ द्यायची नाही, असा निर्णय केलेला आहे. त्यानंतर काही काही ठिकाणी अशा घटना होत आहेत. या पाठीमागे काही राजकीय षडयंत्र आहे असा वास आता यायला लागला आहे अशी शंकाही त्यांनी वक्त केली.

Previous articleगुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत
Next articleगुजरातमध्ये वारेमाप दारु, पैसा व सरकारी यंत्रणेचा गैरवापर : नाना पटोलेंचा गंभीर आरोप