अखेर ‘त्या’ वादग्रस्त पीआयची बदली ; संपत्तीची होणार चौकशी तर राहुरीत तिघांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

मुंबई नगरी टीम

नागपूर । अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांचे धर्मांतर घडविण्याच्या कामात संबंधित ख्रिस्ती मिशनरींना साहाय्य करणारे स्थानिक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात येत असून,या प्रकरणी कडक धोरण अवलंबिले जाईल अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी आज लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत केली. सदर अधिका-याची अतिरिक्त पोलीस अधीक्षकांद्वारे विभागीय चौकशी आणि त्यांनी जमवलेल्या संपत्तीची भ्रष्टाचारविरोधी पथकाद्वारे चौकशी करू असे सांगतानाच राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे असेही देसाई यांनी सांगितले.

आज विधानसभेच्या विशेष बैठकीत भाजप सदस्य राम सातपुते यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील श्रीमती मीरबाई हरेल या हिंदू महिलेच्या धर्मांतरासाठी ख्रिस्ती मिशन-यांना पाठबळ दिल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची पदावरून उचलबांगडी करावी अशी मागणी सातपुते यांनी लावून धरली.आमदार संजय गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी यापूर्वीही असलेल्या ठिकाणीही धर्मांतरासाठी साहाय्य केल्याचा आरोप केला.यापूर्वी ते ज्या पदांवर होते तेथेही त्यांनी असे प्रकार करून अवैध संपत्ती गोळा केली आहे. त्यांच्या संपत्तीचीही चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली.यावेळी विषयाचे गांभीर्य सांगताना सातपुते म्हणाले,तिथे ख्रिस्ती मिशनरी हिंदू देवतांच्या मूर्ती पाण्यात बुडवून मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात. धर्मांतर प्रयत्नात पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सुपारी घेतल्यासारखे साहाय्य करतात.ख्रिस्ती प्रचारकांना संरक्षण देऊन त्यांनी धर्मांतराची सुपारी घेतात.तळागाळातील समाजाचे अंत्यविधी ठिकाणी अनधिकृतरित्या मिशन-यांनी क्रॉस लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी अनधिकृत चर्च उभारण्यात आली आहेत.पोलीसात तक्रारी दाखल झाल्यास पैसे घेऊन प्रकरणे मिटवली जातात.पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे पूर्वी होते तेथेही धर्मांतर करण्यासाठी साहाय्य करत होते असा खळबळजनक आरोपही सातपुते यांनी यावेळी केला.

सदर अधिका-याची अतिरिक्त पोलीस अधीक्षकांद्वारे विभागीय चौकशी आणि त्यांनी जमवलेल्या संपत्तीची भ्रष्टाचारविरोधी पथकाद्वारे चौकशी करू अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.या प्रकरणात दोषी आढळल्यास दराडे यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही शंभूराज देसाई यांनी सांगितले.दरम्यान सरकारच्या निर्णया विरोधात आज राहुरीच्या पोलीस ठाण्यासमोर तीन व्यक्तींनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला असून सरकारच्या या निर्णया विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे तर काही सामाजिक संघटनांकडून उद्या शनिवारी राहुरीत रास्ता रोको करण्यात येणार आहे.

Previous article३२ वर्षाच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलयं : आदित्य ठाकरेंचा सत्ताधा-यांवर निशाणा
Next articleविरोधकांचा कामकाजावर बहिष्कार,विधानभवनाच्या पाय-यांवर भरवले प्रती सभागृह