विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार,विधानभवनाच्या पाय-यांवर भरवले प्रती सभागृह

मुंबई नगरी टीम

नागपूर । राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी अध्यक्षांना केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले.सत्ताधा-यांच्या या निर्णायमुळे आज विरोध आक्रमक झाले होते.सरकारने सीमा प्रश्नावर ठराव करावा अशी मागणी करीत आजच्या कामकाजावर विरोधकांनी बहिष्कार टाकत विधानभवनाच्या पाय-यावर प्रती सभागृह भरवत सरकारवर हल्लाबोल केला.विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे विधानसभेचे कामकाज चार वेळा तहकूब करण्यात आले.

राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांना नागपूर मध्ये सुरू असणारे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा ठराव संमत करण्यात आल्यावर आक्रमक झालेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पाय-यावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.आज विधानसभेची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र विरोधी पक्षाने विशेष बैठक आणि नियमित कामकाजावर बहिष्कार टाकला.विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात होताच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रथम १५ मिनिटांसाठी तर त्यानंतर तालिका अध्यक्षांनी दुस-यांदा अर्ध्यातासासाठी कामकाज तहकूब केले. कामकाजाला पुन्हा सुरू झाले मात्र विरोधी पक्षाचे सदस्य उपस्थित नसल्याने पुन्हा दोनदा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.या दरम्यान विरोधकांनी विधानभवनाच्या पाय-यावर प्रती सभागृह भरवत सरकारवर टीकास्त्र सोडले.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक बांधवांना आधार देण्यासाठी,मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे.सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत. त्यामुळे तो ठराव घ्या अशी विनंती करण्यात आली होती परंतु आज आठवडा संपत आहे तरीही त्यांनी तो ठराव घेतला नाही मात्र सोमवारी तो ठराव कोणत्याही परिस्थितीत घेण्यास भाग पाडू अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले.

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना महाविकास आघाडीचे आमदार श्रद्धांजली वाहत आहे आणि दुसरीकडे शिंदे सरकार कामकाज करत आहेत.मुळात सरकारने विधानसभा सदस्य म्हणून आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहून कामकाज थांबवायला हवे होते असे मत व्यक्त करत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.प्रती सभागृह भरविण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यावर ठिय्या आंदोलन करीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.शिंदे फडणवीस सरकारने आवाज दाबण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले होते.बेळगाव कारवार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,सरकार हमको दबाती कर्नाटक को घबराती है,कुंभकर्णाने घेतलं झोपचं सोंग तिकडे कर्नाटक सरकार मारतंय बोंब,कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध,लोकशाहीचा खून करणा-या सरकारचा धिक्कार असो,कर्नाटक सरकार मुजोरी करतंय,महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय,सीमा प्रश्नी भूमिका घ्या नाहीतर खुर्च्या खाली करा,भूखंडाचा श्रीखंड खाणा-या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो अशा घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या एक इंच देखील जमीन तुमच्या भागात जाऊ देणार नाही असा स्पष्ट इशार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आज दिला.काल कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री बोम्मई एक इंचही जमीन देणार नाही म्हणाले त्यावर आज विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी कर्नाटक सरकारला सीमा प्रश्नावरुन निर्वाणीचा इशाराच यावेळी दिला.भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आले.

Previous articleअखेर ‘त्या’ वादग्रस्त पीआयची बदली ; संपत्तीची होणार चौकशी तर राहुरीत तिघांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न
Next articleसीमाप्रश्नावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सरकारवर घणाघाती टीका….काय म्हणाले चव्हाण ?