महापालिका निवडणुकीसाठी मनसे ॲक्शन मोडमध्ये, घेणार राज्यस्तरीय बैठक

मुंबई नगरी टीम

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्ष तयारीला लागले असून यात आता मनसेही मागे नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची मंगळवारी राज्यस्तरीय बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांना लेखी अहवाल स्वरूपात माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनसेच्या मंगळवारी पार पडणाऱ्या या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

२०२१ आणि २०२२ या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात मनसेनेही सक्रियता दाखवली असून निवडणुकीच्या दृष्टीने पाहिले पाऊल उचलले आहे. मंगळवारी मनसे आपली राज्यस्तरीय बैठक घेणार आहे. स्थानिक स्तरावरील निवडणुका, पक्ष संघटना, स्थानिक स्थरावरील राजकीय आणि सामाजिक स्थिती, जनतेचा कल, पक्षातील रिक्त जागा यासंदर्भात बैठकीत मंथन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यानुसार पदाधिकाऱ्यांना लेखी अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांत कृष्णकुंजवर विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे सत्र सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत आहेत.त्यामुळे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज ठाकरे हे स्वतः सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडत असताना आगामी महापालिका निवडणुकीचीही चाहूल लागली आहे. औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार या राज्यातील पाच बड्या महापालिकांची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. तर २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी देखील राजकीय पक्षांची जय्यत तयारी सुरू झाल्याचे दिसत आहे.

Previous articleराज्यपालांनी घटनेचा खून करु नये; १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांचा टोला
Next articleअतिवृष्टी,पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ हजार १९२ कोटी वितरीत