अतिवृष्टी,पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ हजार १९२ कोटी वितरीत

मुंबई नगरी टीम

मुंबई : जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या दुसऱ्या हप्त्यापोटी २ हजार १९२ कोटी ८९ लाख ५ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत २ हजार २९७ कोटी ६ लाख रूपये नोव्हेंबर २०२० मध्ये वितरीत करण्यात आले होते . तर आता दुसऱ्या हप्त्यापोटी २ हजार १९२ कोटी ८९ लाख ५ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) नुकसानीसाठी रु.१० हजार प्रती हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार प्रती हेक्टर या दराने २ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आहेत.या बाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

Previous articleमहापालिका निवडणुकीसाठी मनसे ॲक्शन मोडमध्ये, घेणार राज्यस्तरीय बैठक
Next articleमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक बाजू मांडावी