शिंदे- फडणवीस सरकारबद्दल शेतक-यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी : अजित पवारांचा हल्लाबोल

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारबद्दल शेतक-यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. सरकारने शेतक-यांवर जलसमाधी घेण्याची वेळ येऊ देता कामा नये.महाविकास आघाडीचे सरकार असताना कुणी आंदोलनाची भूमिका मांडली तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो मात्र आत्ताच्या सरकारला शेतकऱ्यांसोबत चर्चाच करायची नाही ही भूमिका लोकशाहीमध्ये चुकीचे आहे असे सांगतानाच सरकारने शेतक-यांच्या समस्या ऐकण्यासाठी वेळ दिला पाहिजे असे रोखठोक मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडले.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना जी मदत मिळायला हवी होती तशी मदत मिळाली नाही.शिवाय शेतक-यांना पीक विम्याचे पैसे तुटपुंजे मिळत आहेत.यासंदर्भात केंद्रसरकारची मदत घेऊन या विमा कंपन्यांना ऐकायला भाग पाडण्यासाठी गरजेचे आहे.यासंदर्भात काही शेतकरी न्यायालयात गेले आहेत. शेतकऱ्यांचा पीक विमा राज्यसरकार काढत असते त्याला काही प्रमाणात केंद्रसरकारची मदत होत असते.शेतकऱ्यांना स्वतः च्या पीक विम्याच्या पैशासाठी न्यायालयात जाण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये.सरकारने यासाठी पुढाकार घेतला घ्याला गरज पडल्यास केंद्रसरकारला हस्तक्षेप करायला सांगून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली.राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्या सुरूच असल्याचे पवार यांनी सांगून,स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारकडे आपल्या मागण्या केल्या आहेत.यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बैठक घ्यावी अशी त्यांची मागणी आहे.यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र देणार असल्याचे पवार म्हणाले.

सध्या रब्बीचा हंगाम सुरू झाला असल्याने शेतक-यांना मोठ्याप्रमाणावर पाण्याची गरज आहे. एकीकडे रात्री थंडी आणि दिवसा उन्हाची तीव्रता त्यामुळे पिकांना पाणी लागत असताना दुसरीडे शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडण्याचा धडक कार्यक्रम सुरू झाला आहे.यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.वीज जोडण्या तोडण्या थांबवण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही.अधिकारी वर्ग आडमुठेपणा घेत आहे याचीही नोंद सरकारने घ्यायला हवी अशी मागणीही पवार यांनी केली.यावेळी गुजरात निवडणुकीवरून पवार यांनी सरकारला लक्ष्य केले.गुजरातमध्ये निवडणूका असल्याने राज्यातील ठराविक जिल्हयात पगारी सुट्टी जाहीर केली आहे या निर्णयावर पवार यांनी नाराजी व्यक्त करीत हे पहिल्यांदाच पहायला मिळाले असल्याचे सांगितले. असे आदेश पहिल्यांदा काढले हे पहायला मिळत आहे. वास्तविक असे नवीन पांयडे पाडणे चुकीचे आहे असे स्पष्ट मतही पवार यांनी व्यक्त केले.राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून मंत्रिमंडळातील मंत्री वेगवेगळी वक्तव्य येत आहे.अशा वक्तव्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते आहे.आता तर वरीष्ठ पदावर बसणारी महत्त्वाच्या व्यक्तींना तारतम्य राहिलेले नाही. सत्ताधारी पक्षाचे प्रवक्त्यांना बोलण्याचे तारतम्य राहिलेले नाही.त्यामुळे सर्वांनीच बोलताना तारतम्य ठेवले पाहिजे असेही ते म्हणाले.

राज्यपाल वारंवार आक्षेपार्ह विधाने करत आहेत.ते वारंवार असे का वागतात आणि सत्ताधारी यांच्याबद्दल का गप्प बसतात हे एक महाराष्ट्राला पडलेले कोडं आहे. राज्यपालांची भेटायचो त्यावेळी ते म्हणायचे अजितजी मुझे अभी बस.. मुझे अभी यहा नही रहना है… जाना है… हे खोटं नाही खरं आहे.याबाबत मी त्यांना वरिष्ठांना सांगा असे सांगितले होते. त्यांना जाण्याकरता वरिष्ठ परवानगी देत नाही म्हणून ते अशी वक्तव्य केल्यानंतर तरी वरिष्ठ आपल्याला येथून पाठवतील. एखाद्या अधिका-यांची बदली एखाद्या टिकाणी केली मात्र त्याला हवी ती जागा मिळावी त्यासाठी तो वेडंवाकडं काम करतो की त्याची बदलीच होते.तसे काही राज्यपालांच्या मनात आहे का अशा प्रकारची शंका घ्यायला जागा निर्माण होते असा उपरोधिक टोलाही पवार यांनी लगावला.महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याची दखल केंद्रसरकारने घेतली पाहिजे आणि त्यांना महाराष्ट्रातून परत बोलवावे व महाराष्ट्राचा अपमान थांबवावा अशी मागणी पवार यांनी यावेळी केली.

बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. आता महाराष्ट्रातील काही गावे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य जनतेला आवडलेले नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत यावर एकत्र बसून महाराष्ट्राबद्दल काय नक्की भूमिका आहे हे सरकारने ठोसपणे जनतेला सांगितले पाहिजे असेही पवार म्हणाले.मुंबई – गोवा महामार्गावरूनही त्यांनी यावेळी गडकरी यांना टोला लगावला.नितीन गडकरी हे या खात्याचे आठ वर्ष मंत्री आहेत. युपीए सरकार असल्यापासून काम सुरू त्याबद्दल एक पुस्तकच लिहिले पाहिजे. ‘बॉम्बे टू गोवा’ जसा सिनेमा होता तशापध्दतीने एक ‘बॉम्बे टू गोवा’ पुस्तक लिहिले पाहिजे. कशाकरता वेळ लागतोय माहित नाही. मुंबई – गोवा हा महामार्ग लवकर झाला पाहिजे. नितीन गडकरी यांना मी नागपूरला भेटल्यावर ‘तिसरा डोळा’ उघडा असे सांगणार आहे असाही उपरोधिक टोला पवार यांनी लगावला.

Previous articleआदित्य ठाकरे उद्या बिहारच्या दौ-यावर, तेजस्वी यादव यांची भेट घेणार
Next article“ये दोस्ती आगे चलती रहेगी” म्हणत आदित्य ठाकरेंनी घेतली नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट