मुंबई नगरी टीम
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद अद्याप निवळलेला नाही. कंगनाविरोधात टीका केल्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप घेतला. तर संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणीही अनेकांकडून करण्यात आली. पंरतु महिलांचा आदर करण्याची शिकवण शिवसेनेला आहे, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे. ट्विटरच्या माध्यमातून एक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
संजय राऊत म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या महान विचारांवर शिवसेना चालते.महिलांचा आदर करण्याची शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे.पण शिवसेना महिलांचा अपमान करत असल्याचे काहीजण जाणीवपूर्वक पसरवत आहेत.पंरतु हे तथ्य कोणी विसरता कामा नये, की आरोप करणाऱ्यांनी स्वतः मुंबई आणि मुंबादेवीचा अपमान केला आहे. महिलांच्या अभिमानसाठी शिवसेना कायम लढा देत राहील.हीच शिकवण शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला दिली आहे”, असे ट्विट संजय राऊतांनी केले आहे.
दरम्यान, एका मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांनी कंगनाचा उल्लेख ‘हरामखोर मुलगी’ असा करत तिच्यावर टीका केली होती. या टिपण्णीनंतर अनेकांनी संजय राऊतांवर टीका करत कंगनाची माफी मागण्याची मागणी केली. पंरतु कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी माफी मागण्याचा विचार करेन, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे संजय राऊत आणि कंगनामधील हे ट्विटर वॉर सध्या कायम आहे.