बेळगावात बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचे कर्नाटक सरकारचे कारस्थान

मुंबई नगरी टीम

मुंबई । बेळगावमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कर्नाटक न्यायालयाने समन्स बजावले असून,त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.कर्नाटक सरकारने कायद्याचे बडगे दाखवून तुरूंगात डांबल तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील असे त्या भाषणात म्हणालो होतो.त्यात प्रक्षोभक काय आहे ? असा सवाल करून आमच्यासारख्या लढणाऱ्या लोकांना बेळगावात बोलावून हल्ला करण्याचे कारस्थान आहे, असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

सीमा भागात बेळगाव मध्ये केलेल्या भाषणामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कर्नाटक न्यायालयाने समन्स बजावत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे.त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी कर्नाटक सरकारवर हल्लबोल केला.तुम्हाला तुरुंगात टाकायचे असेल तर खुशाल टाका मी घाबरणार नाही.सीमा प्रश्नासाठी शिवसेनेने या आधी ६९ हुतात्मे दिले आहेत.मी ७० वा हुतात्मा व्हायला तयार असून,या निमित्ताने माझ्यावर हल्ला करण्याचे कारस्थान असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.कर्नाटक सरकारने कायद्याचे बडगे दाखवून तुरुंगात डांबल तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील, असे त्यावेळी केलेल्या भाषणात म्हणालो होतो.यामध्ये प्रक्षोभक काय ते कळले नाही. २०१८ मध्ये केलेल्या भाषणाची दखल घेऊन त्यांनी न्यायालयात हजर राहायला सांगितले आहे.मी न्यायालयात जावे मग न्यायालयात गेल्यावर माझ्यावर हल्ला व्हावा अशी माहिती आहे. किंवा या निमित्ताने मला अटक करावी आणि बेळगावच्या तुरूंगात टाकावे अशा प्रकराचे कारस्थान सुरू असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

शिवसेना लढण्यासाठी तयार आहे असे सांगतानाच,बाळासाहेबांनी सीमा प्रश्नासाठी तीन महिन्याचा तुरुंगवास भोगला आहे.त्यावेळी शिवसैनिकांनी तीन दिवस मुंबई पेटवली होती.मला अटकेची भीती नाही.महाराष्ट्रासाठी मला अटक करणार असतील तर मी नक्की जाईल.मी लपून छपून जाणार नाही.कोल्हापूरच्या रस्त्याने हजारो शिवसैनिक जातील आणि बेळगावच्या न्यायालयात स्वत:ला अटक करून घेऊ.किती दिवस तुरुंगात ठेवायचे ठेवा असे आव्हान राऊत यांनी कर्नाटक सरकारला दिले.सरकारने सीमा प्रश्नासाठीची जबाबदारी मंत्री शंभुराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांना दिली आहे.त्यामुळे मला दिलेल्या समन्सची दखल त्यांनी घेतली पाहिजे.राजकीय वाद बाजूला ठेवा याकडे महाराष्ट्र म्हणून पाहा.कर्नाटक सरकार आपली कोंडी करत आहेत.महाराष्ट्राविषयी बोलणारे सीमाप्रश्नावर बोलणाऱ्यांना अडकवू पाहत आहेत.मी या विषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असून,महाराष्ट्र सरकारने त्यात हस्तक्षेप करावा अशी मागणीही त्यांनी केली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर,सांगलीच्या भागांवर दावा सांगितला आहे. त्यांनीच या विषयाला तोंड फोडले आहे.त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिहल्ला केला नाही.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले पण त्यात दम नाही असा टोला राऊत यांनी लगावला.सीमा प्रश्नावर ३० तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे.त्या पार्श्वभूमीवर बोम्मई जत आणि सोलापूरवर हक्क सांगतात.त्याच वेळेला बेळगाव आणि कारवारमध्ये प्रचार सुरू करून मराठी लोकांना धमकावत आहेत. मराठी लोकांच्या हाकेला शिवसेनाच धावून येईल हे त्यांना माहिती आहे.म्हणून आमच्यावर कायद्याचा बडगा उगारून अटकेची भीती दाखवली जात आहे.भाजपच्या भाषेत सांगायचे तर ही कालगणना समजून आहे ही सर्वच राजकीय पक्षांशी समजून घेतली पाहिजे असेही राऊत म्हणाले.

Previous articleमहानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय
Next articleमहिनाभरात स्मारकाचा प्रश्न निकाली निघाला नाही तर कुटुंबियांसह सत्याग्रह आंदोलनात सहभागी होणार