महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई । विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांतील अपूर्ण आणि चुकीचे पत्ते व त्यात नोंदविलेल्या मतदारांच्या नावांमुळे महानगरपालिकांच्या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यकतेनुसार इमारत वस्ती,कॉलनी राहिवास क्षेत्राप्रमाणे पत्त्यामध्ये दुरूस्ती करण्याकरिता तातडीने मोहीम राबवावी,असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान व मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत.

विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांवरून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात मदान यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत भारत निवडणूक आयोगातर्फे सध्या विधानसभा मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यांतर्गत येत्या ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे याच कालावधीत ही मोहीम राबवावी.एखाद्या मतदाराचा संपूर्ण पत्ता असूनही तो चुकीच्या विभाग पत्त्यामध्ये जोडण्यात आला असल्यास तो दुरूस्त करावा.शक्य असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार वेगळा पत्ता विभाग तयार करावा असे मदान यांनी सांगितले.

या मोहीम काळात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी प्रत्येक यादी भागाचा बारकाईने आढावा घ्यावा. विशेषत: नवीन इमारतींबाबत जास्त गोंधळ आढळून येतो. तो टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेवून नवीन सेक्शन ॲड्रेस संकलित करून मतदार नोंदणी अधिकारी यांनी यादी भागात पत्त्यानुसार सेक्शन तयार करून त्या ठिकाणी राहणाऱ्या मतदारांची नावे नोंदविले जातील, याची दक्षता घ्यावी असे देशपांडे यांनी सांगितले.

Previous articleमुख्यमंत्री आणि त्यांचे आमदार खासदार उद्या गुवाहटीच्या दौऱ्यावर ! मात्र गुलाबराव पाटील जाणार नाहीत
Next articleबेळगावात बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचे कर्नाटक सरकारचे कारस्थान