मुंबई नगरी टीम
नांदेड : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे आपल्या सरकारवर कोणतेही नियंत्रण नसल्याने त्याकाळात देश रसातळाला गेला,अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात देशाची कशी वाताहत झाली याचे आत्मचिंतन देवेंद्र फडणवीस यांनी करावे,असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ट्विटरवरून त्यांनी फडणवीसांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
“डॉ. मनमोहनसिंह यांचे आपल्या मंत्रिमंडळावर नियंत्रण नसल्याने देश रसातळाला गेला.असे बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी मागील साडेसहा वर्षांपासून मंत्रिमंडळावर हुकुमी वर्चस्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाची कशी वाताहत झाली, त्याचे आत्मचिंतन देवेंद्र फडणवीस यांनी केले पाहिजे”, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्हर्च्युअल रॅलीचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या तत्कालीन सरकारवर टीका केली.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे सज्जन व्यक्ती होते.पण त्यांचे सरकारवर नियंत्रण नव्हेत. त्यामुळे त्याकाळात देश रसाळातला गेला,अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांबाबत बोलताना म्हटले की,मोदी हे एक कणखर नेतृत्त्व आहे. केवळ बोलणारे नव्हे,तर काम करून दाखवणारे नेतृत्व आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी मोदींची तुलना स्वामी विवेकानंद यांच्याशी केली. स्वामी विवेकानंद यांच्याकडून प्रेरणा घेऊन संन्यासी योद्धा म्हणून मोदी काम करीत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.