सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासाठी सोमवारी मनसे करणार आंदोलन

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच लोकलने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परंतु अत्यावश्यक सेवा वगळता बसने प्रवास करणा-या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.त्यामुळे सर्वांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी अशी,मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.मात्र सरकारने यावर काही निर्णय न घेतल्याने मनसे आता आपल्या अंदाजात आंदोलन करणार आहे.

मनसेकडून येत्या सोमवारी रेल्वेने प्रवास केला जाणार आहे.राज्य सरकारच्या नियमाला डावलुन मनसे जनतेच्या हितासाठी सोमवारी रेल्वेने प्रवास करत आंदोलन करणार आहे.मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ही माहिती दिली आहे. तर या आंदोलनाला रेल्वे प्रवासी संघटनेचा देखील पाठिंबा असणार आहे.यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील त्यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. “संपूर्ण टाळेबंदीच्या परिस्थितीत रेल्वे बंद आहे. सध्या बससेवा चालू आहे. परंतु या बससेवेमुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. आठ-आठ तास लोकांना घरी जायला लागत आहेत. या लोकांचे हाल बघवत नाहीत. वारंवार विनंती करूनही सरकार रेल्वे सेवा चालू करत नाही आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ किंवा पालघरपासून येणारे जे लोक आहेत, त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. विनंती करून सरकार ऐकत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सविनय कायदेभंग करणार आहे. आम्ही रेल्वेने प्रवास करणार आहोत. जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास, अशी घोषणा संदिप देशपांडे यांनी केली आहे.

मुंबईत रेल्वेने प्रवास करणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये याकरता अत्यावश्यतक सेवेतील लोकांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तर इतरांसाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे. अनेकदा बस फे-या कमी असल्याने नागरिकांना ताटकाळत उभे राहावे लागते. त्यामुळे अनेकांनी रेल्वेसेवेची मुभा देण्याची मागणी केली आहे. मनसेने देखील ही मागणी लावून धरली असून त्यासाठी आता सोमवारी आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईत ३० सप्टेंबर पर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यात मनसेने पुकारलेल्या आंदोलनामुळे मोठा वादंग उठण्याची शक्यता आहे.

Previous article…अन्यथा राजकारणाला रामराम ठोकणार : खा. उदयनराजे भोसलेंचा इशारा
Next articleमोदींच्या कार्यकाळात देशाची कशी वाताहत झाली ते आधी पहा ; अशोक चव्हाण