…अन्यथा राजकारणाला रामराम ठोकणार : खा. उदयनराजे भोसलेंचा इशारा

मुंबई नगरी टीम

सातारा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा लागला तर वाटेल त्या परिस्थितीत देणारच,अशी भूमिका भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे.मराठा आरक्षण सरकारने केले तर ठीक आहे, अन्यथा राजकारणाला रामराम करेन आणि राजीनामा देईन, असे मोठे विधान भाजपचे खासदार उदयनराजे  भोसले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. कोणाला न्याय देता येत नसले,तर पदावर राहून काय करायचे,असेही ते यावेळी म्हणाले.

मी कधी राजकारण केले नाही.आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा लागला तर तो मी कोणत्याही परिस्थितीत देणारच.मी जे बोलतो ते मनापासून बोलतो.मी कधीही राजकारण केले नाही. त्यामुळे केवळ मराठा समाजासाठी नव्हे तर ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्या सर्वांसाठी मी राजीनामा देणार. जर काही होत नसेल तर पदावर राहून काय उपयोग”, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

उदयनराजे भोसले यांना मराठा आरक्षण लढ्याच्या नेतृत्त्वावरून यावेळी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी नेतृत्व कोणीही करावे. मूळ प्रश्न सोडवण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, जे माझ्या मनाला पटते ते मी करणार. राजकारण करणे आपल्याला पटत नाही. अन्याय जिथे होत असेल तिथे मी उतरणार. दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी पोलीस भरतीवर बोलण्यास मात्र नकार दिला.मी पोलीस भरतीवर भाष्य करणार नाही, असे उदयनराजे म्हणाले. राज्य सरकारने साडे बारा हजार पदांसाठी पोलीस भरती जाहीर केली आहे.पंरतु भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या भरती प्रक्रियेला विरोध दर्शवला आहे.

Previous article…आणि राष्ट्रवादी महिला आघाडीने पंतप्रधान मोदींना पाठवले कांदे
Next articleसर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासाठी सोमवारी मनसे करणार आंदोलन