कृपाल तुमानेंनी आरोप सिद्ध करून दाखवावे,अन्यथा घरी बसायची तयारी ठेवावी !

मुंबई नगरी टीम

मुंबई । अजित पवार अर्थमंत्री असताना किती खोके जमवले ते सांगावे.पैसे घेतल्याशिवाय अजित पवार कामच करत नव्हते, असा गंभीर आरोप शिवसेनेचे ( शिंदे गट ) खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.मी अर्थमंत्री असताना एकाने जरी पैसे घेतले असे सांगितले तर मी राजकारण सोडेन आणि कृपाल तुमाने यांनी सिद्ध करून दाखवावे आणि नाही सिध्द करुन दाखवले तर त्याने घरी बसायची तयारी ठेवावी असा सज्जड इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गुणवत्तेनुसार पदस्थापना देण्यात आली नसून चुकीच्या पद्धतीने पदस्थापना देण्यात आल्याची तक्रार चार आमदारांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करताच मुनगंटीवार यांनी आमदारांच्या तक्रारींची दखल घेत या बदल्यांना तातडीने स्थगिती दिली.हे प्रकरण ताजे असतानाच आज शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला.अजित पवार अर्थमंत्री असताना किती खोके जमवले ते सांगावे. पैसे घेतल्याशिवाय अजित पवार कामच करत नव्हते या खासदार तुमाने यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.तुमाने यांच्या आरोपावर विरोधी पक्षनेते प्रत्युत्तर देत,एकाने जरी मी अर्थमंत्री असताना पैसे घेतले असे सांगितले तर मी राजकारण सोडेन आणि कृपाल तुमाने यांनी सिद्ध करून दाखवावे आणि नाही सिध्द करुन दाखवले तर त्याने घरी बसायची तयारी ठेवावी असा सज्जड इशारा अजित पवार यांनी दिला.हे असले आरोप माझ्यावर करायचे नाही.खाजगीत कुणालाही विचारा माझ्या कामाची पद्धत कशी आहे ती,उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला.त्याने एक तरी माणूस उभा करावा माझ्यासमोर अजित पवारांना पैसे दिल्यावर काम झाले सांगणारा असे जाहीर आव्हान अजित पवार यांनी खासदार कृपाल तुमाने यांना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम ९ जून रोजी (केडगाव) अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, वेधशाळेच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे.या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक व प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच वेधशाळेच्या सतर्कतेच्या इशाऱ्याचे पालन करून वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम पुढे ढकलत आहोत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.अवकाळी आणि वादळी वाऱ्याने अतोनात नुकसान होत आहे.यावर सरकारने मदत करा असे फक्त आदेश दिले आहेत. परंतु प्रत्यक्षात मदत होत नाही. सरकारने एक हजार ८० कोटी रुपये कारखान्यांना मंजूर केले होते परंतु त्यातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत फक्त पाच कारखान्यांना साडे पाचशे कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार, रावसाहेब दानवे यांचा संबंधित कारखाना, हर्षवर्धन पाटील यांच्या संबंधित कारखान्यांना ही मदत जाहीर केली आहे. बाकीच्या कारखान्यांना मात्र राजकीय नजरेने बघून चालत नसते परंतु हे सरकार ‘हम करेसो कायदा’ यापध्दतीने काम करत आहे असा आरोपही पवार यांनी केला.

पुणे आणि चंद्रपूरची निवडणूक लागण्याची शक्यता आहे.या निवडणूका जाहीर होण्याअगोदर जागा कुणी लढवायच्या यावर चर्चा होईल. चंद्रपूर तर कॉंग्रेसची आहे आणि पुणे जागेबद्दल कॉंग्रेसचे वेगळे मत आहे, आमचेही वेगळे मत आहे. त्यातून आम्ही मार्ग काढू असेही त्यांनी स्पष्ट केले.सध्या आपल्या राज्यात प्रचंड प्रमाणावर जाहीरातबाजी होत आहे. ‘शासन आपल्या दारी’ शासनाने उपक्रम सुरू केला आहे त्यात काही ठिकाणी खुर्च्या रिकाम्या दिसत आहे. त्याचे फोटो येत आहेत. मंत्र्यांचा तोल जातो आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जाहिराती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात असताना अतिशय चुकीच्या व खोट्या आणि शासनाने निर्णय न घेतलेल्याजाहिराती दाखवून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली जात आहे असा थेट आरोप अजित पवार यांनी केला.वनविभागाच्या बदल्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आहे.अधिकारी सांगत आहेत आम्हाला अधिकार जरी असले तरी मंत्रालयातून आलेल्या यादीमधील आदेश पाळावेत असे तोंडी आदेश असल्याचे सांगत आहेत. काहीजण परदेशात गेले आहेत. बदल्या होणे आणि यांनी परदेशात जाणं हा योगायोग आहे का हा एक संशोधनाचा भाग आहे असा टोला लगावतानाच माजी खासदार राजू शेट्टी यांनीसुध्दा रेटकार्ड मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठवले होते तर दुसरीकडे जिल्हाधिकारी बदल्यांचा रेट किती आहे यात कुठल्या आमदारांनी जिल्हाधिकारी यांच्या बदल्या सांगितल्या तर बदल्या होणार हा ठराविक आमदारांना अधिकार दिला आहे. कृषी सहायक पदासाठी रेट तीन लाख रुपये असल्याचे बोललो जात आहे. लाखो करोडो रुपये देऊन आलेले अधिकारी प्रामाणिकपणे काम कसे करु शकतील. शासन आपल्या दारी आणले आणि शासनाला कुठे नेले तरीदेखील शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता ही बदलल्याशिवाय ‘शासन आपल्या दारी’ ही फसवणूक चालली आहे ती थांबणार नाही असा थेट हल्लाबोलही पवार यांनी केला.

Previous articleजागा वाटप महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा ठरणार का ? अशोक चव्हाण यांनी स्पष्टच सांगितले
Next articleये फेव्हिकॉल का जोड है टूटेगा नहीं ! मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे पुन्हा ” मिले सुर मेरा तुम्हारा “