ये फेव्हिकॉल का जोड है टूटेगा नहीं ! मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे पुन्हा ” मिले सुर मेरा तुम्हारा “

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेकडून राज्यातील सर्वच वर्तमान ‘देशात मोदी,महाराष्ट्रात शिंदे’ अशा आशयाची जाहिरात देण्यात आली होती.या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे नाराज झाले होते.त्यांनी दोन दिवस मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणे टाळले होते.मात्र आज पालघर मध्ये झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनोमिलन झाल्याचे चित्र होते.ये फेव्हिकॉल का जोड है टूटेगा नहीं असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीसांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेकडून दोनच दिवसांपूर्वी राज्यातील वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये ‘देशात मोदी,महाराष्ट्रात शिंदे’ असा उल्लेख करण्यात आला होता. मुख्यमंत्रीपदासाठी २६.१ टक्के जनतेची एकनाथ शिंदेना तर २३.२ टक्के जनतेची पसंती देवेंद्र फडणवीसांना असल्याचे या जाहिरातीत नमूद करण्यात आले होते.यावरून उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे नेते कमालीचे नाराज होते.या नाराजीमुळे शिवसेनेकडून ( शिंदे गट ) बुधवारी पुन्हा एक जाहिरात देण्यात आली.त्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा फोटो देण्यात येवून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.मात्र नाराज असलेल्या फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या सोबतचे कार्यक्रम टाळले होते.यामुळे शिवसेना भाजपमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा होती.मात्र आज पालघरमध्ये झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच हेलिकॉप्टरमधून पालघरला गेले.कार्यक्रमाच्या ठिकाणी एकाच व्यासपीठावर जवळजवळ बसले असतानाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोबाईल मध्ये व्यस्त होते.परंतु यावेळी केलेल्या केलेल्या भाषणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपल्या मध्ये नाराजी नसल्याचे दाखण्याचा प्रयत्न केला.

माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची दोस्ती आताची नाही.तर ते आमदार आणि मी आमदार होतो. तेव्हापासून आमची मैत्री आहे असे सांगून ये फेव्हिकॉल का जोड है टूटेगा नहीं असेही मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीस यांचा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला.काही लोक आमच्या जोडीला जय विरुची जोडी म्हणतात पण ही जोडी युतीची आहे.काही लोक स्वार्थासाठी एकत्र आले होते त्यांना जनतेने दूर केले, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरु केलेल्या अनेक योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या.आता राज्यात डबल इंजिन सरकार आहे. फडणवीसांच्या अनुभवाचा फायदा मविआने करुन घेतला नाही. आता आम्ही बंद पडलेल्या योजना पुन्हा सुरु केल्या.राज्याला विकासाच्या वाटेवर आणले, अशी स्तुतीही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात एखाद्या जाहिरातीमुळे काही होईल इतके हे सरकार तकलादू नाही, आम्ही २५ वर्षं एकत्र होतो, मात्र या वर्षभरातला प्रवास अधिक घट्ट आहे असे सांगून फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

शिंदे आणि माझा प्रवास हा २५ वर्षांचा असून आम्ही दोघेही गेल्या २५ वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. पण गेल्या वर्षभरात आमचे नाते घट्ट झाले आहे, आमचा एकत्रित प्रवास २५ वर्षांपासून आहे असेही फडणवीस यावेळी म्हणाले.मागचे सरकार आपल्याला घरी बसलेले पाहायला मिळाले. मात्र आत्ताचे सरकार आपल्या दारी आहे. मागचे सरकार घरी बसले होते. वर्षभरापूर्वी सरकार बदलले या दोन सरकारमधील फरक दिसतो असे सांगून फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.एका जाहिरातीवरून सुरू झालेले शिंदे फडणवीस यांच्यातील नाराजी नाट्य हे पासघरमधिल शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे दूर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Previous articleकृपाल तुमानेंनी आरोप सिद्ध करून दाखवावे,अन्यथा घरी बसायची तयारी ठेवावी !
Next articleकुणी जाहिराती दिल्या,बॅनर,पोस्टर लावले तरी काहीच फरक पडणार नाही