दिवाळी होणार गोड : रवा,चणाडाळ,साखर आणि एक लिटर पामतेल मिळणार फक्त १०० रूपयांत

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.शिधापत्रिकाधारकांना दिवाळीसाठी आवश्यक असणारे रवा,चणाडाळ आणि साखर एक किलो तर १ लिटर पामतेल हे केवळ शंभर रूपयांमध्ये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या निर्णयाचा राज्यातील सुमारे ७ कोटी लोकांना याचा लाभ होणार आहे.यासाठी ५१३ कोटी २४ लाख खर्च येणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना राज्यातील हे सर्वसामान्य जनतेचे सरकार असल्याचे सांगितले होते.त्यानुसार सर्वसामान्य नागरीकांची दिवाळी गोड होण्यासाठी राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावर राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.या मध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती १ किलो रवा,चणाडाळ,साखर व एक लिटर पामतेल याचा समावेश असणार आहे.या निर्णयाचा राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या एकूण ५१३ कोटी २४ लाख रूपयांचा खर्च येणार आहे.या खर्चास देखील आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.राज्य सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयानुसार या संचाचे वाटप दिवाळीपूर्वी व्हावे तसेच या वाटपात कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

Previous articleमी तुमच्या दर्शनासाठी येत आहे, भगवानबाबांच्या आशीर्वादासाठी येत आहे ! पंकजा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Next articleशिंदे सरकारने पोलिसांसाठी घेतला मोठा निर्णय आता घर बांधायला मिळणार पूर्वीसारखे कर्ज