मुंबई नगरी टीम
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या राष्ट्रीय प्रश्न समजून घेत आहेत. बहुतेक त्यांच्या मनात केंद्रात काम करण्याची इच्छा दिसत आहे,असे म्हणत शिवसेना खासदार संजय यांनी देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा निशाणा साधला आहे.शिवसेना हा कन्फ्युज पक्ष आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली होती. या टीकेला प्रत्युत्त देताना संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“देवेंद्र फडणवीस हे सध्या राष्ट्रीय प्रश्नांवर अभ्यास करत आहेत. आमच्या राष्ट्रीय भूमिकांचा ते अभ्यास करत आहेत.बहुतेक त्यांच्या मनात लवकरच केंद्रात जाऊन काम करावे अशी इच्छा दिसतेय”. दरम्यान,देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने बिहारच्या निवडणूक प्रभारीची जबाबदारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना हा टोला हणाला. तर शिवसेना हा कधीही कन्फ्युज पक्ष नाही. एनडीएसोबत सत्तेत असताना देखील ज्या गोष्टी आम्हाला पटल्या नाहीत त्याचा आम्ही विरोध केला व ताठपणे उभे राहिलो. शिवाय कृषी विधेयकावरून राज्यसभेत जे आवाजी मतदान झाले त्याला मी मतदान मानत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दरम्यान,संजय राऊत यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. बिहारमध्ये कोरोना संपला आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सरकाराला, तिथल्या राज्यकर्त्यांना, निवडणूक आयोगाला तसे वाटत असेल तर त्यांनी कोरोना संपला असे जाहीर करावे, अशी मागणी संजय राऊतांनी यावेळी केली. तर बिहारमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार का याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होईल,अशी माहिती देखील संजय राऊत यांनी यावेळी दिली.