अन्यथा मातोश्री आणि सिल्व्हर ओक बाहेर स्वतः ढोल वाजवणार : गोपीचंद पडळकरांचा इशारा

मुंबई नगरी टीम

पंढरपूर : मराठासह राज्यात आता धनगर आरक्षणाचीही ठिणगी पेटली आहे.धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी पंढरपुरात भाजपचे आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात ‘ढोल बजाओ,सरकार जगाओ’ आंदोलन करण्यात आले.आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानांबाहेर ढोल बाजवून आंदोलन करणार,असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी हुतात्मा चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत आंदोलन केले.

“झोपी गेलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी आजचे ढोल बजाओ आंदोलन पुकारण्यात आले आहे. धनगर समाज आज शांततेत आंदोलन करत आहे. जर धनगर समाजाच्या भावनांचा विचार केला नाही व यावर काही निर्णय झाला नाही. तर,मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार.शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थाबाहेर आपण स्वतः ढोल बाजवून आंदोलन करणार”, असा इशारा गोपिचंद पडळकर यांनी दिला आहे.

दरम्यान, राज्य सरकारचा गैरसमज दूर केला आहे. धनगढ नावाची जमात अस्तित्वात नाही. जे आहे ते धनगर आहेत. सरकाराने त्यांना दाखला देण्यास सुरूवात करावी.राज्य सरकारने अध्यादेश काढून आरक्षण द्यावे व केंद्राला यासंदर्भात माहिती द्यावी, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. पंढरपुरासह राज्यातील विविध ठिकाणी धनगर समाजाकडून ढोल बजाओ आंदोलन केले जात आहे. धनगर समाज अधिक आक्रमक होण्याआधी सरकार त्यांच्या आरक्षणाबाबत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleमुंबईच्या डबेवाल्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; केल्या महत्वाच्या मागण्या
Next articleदेवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाण्याचे वेध : संजय राऊतांनी साधला निशाणा