महाविकास आघाडीच्या काळातच फॉक्सकॉन,टाटा एअरबस आणि सॅफ्रॉन प्रकल्प राज्याबाहेर

मुंबई नगरी टीम

मुंबई । फॉक्सकॉन पोठोपाठ टाटा एअरबस आणि सॅफ्रॉन हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोधकांकडून राज्य सरकारला लक्ष्य केले जात असतानाच हे प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्याच्या बाहेर गेले असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आपली अकार्यक्षमता लपविण्यासाठी चुकीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी केली.येत्या दोन वर्षांत महाराष्ट्राला गुंतवणुकीच्या बाबतीत देशात क्रमांक एकचे राज्य बनवू असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस हे प्रकल्प गुजरातला गेल्यापाठोपाठ आता सॅफ्रॉन हा प्रकल्प हैदराबादमध्ये गेल्याने विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेवून विरोधकांचे आरोप खोडून काढत विरोधकांवर पलटवार केला.महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी येणारे गुंतवणूकदार संभ्रमित व्हावेत आणि राज्यात गुंतवणूक येवू नये यासाठी तर महाविकास आघाडीचे हे षडयंत्र नाही ना असा आरोपही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.यावेळी त्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढीत याबाबतचे सर्व कागदपत्रे सादर केले. येत्या दोन वर्षांत महाराष्ट्राला गुंतवणुकीच्या बाबतीत देशात क्रमांक एकचे राज्य बनवू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.काही लोकांनी नाणार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केल्याने हा प्रकल्प महाराष्ट्र आणि केरळ अशा दोन राज्यात विभागून होऊ शकतो, असे संकेत फडणवीस यांनी दिले मात्र हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्रातच असावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नसल्याचे तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीच सांगितले होते.टाटा एअरबस हा प्रकल्प २३ सप्टेंबर २०२१ रोजी गुजरातला नियोजित झाला होता असेही फडणवीस यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेता असताना मी या प्रकल्पाच्या प्रमुखांशी चर्चा केली आणि हा प्रकल्प गुजरातला घेवून जावू नका अशी विनंती केली.ज्या अधिकच्या सवलती हव्या असतील त्यासाठी पाहिजे तर मी तत्कालीन मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांच्याशी बोलतो असे आश्वासन दिले.मात्र महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण नसल्याचे या अधिका-याने सांगितले.हा प्रकल्प राज्याबाहेर चालला असल्याची माहिती मी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे तत्कालीन मुख्याधिका-यांना दिली तसेच मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या कानावर ही बाब घातली. मात्र यांनी त्यावेळी साधे पत्रही दिले नाही असेही फडणवीस यांनी सांगितले.सॅफ्रन तर २ मार्च २०२१ मध्येच हैद्राबादमध्ये त्यांची फॅक्टरी तयार झाली होती.तर बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाईस पार्क हे प्रकल्प महाराष्ट्रात होतील असे केंद्र सरकारने कधी जाहीर केले होते हे आघाडीच्या नेत्यांनी दाखवावेच असे आव्हानही फडणवीस यांनी दिले.राज्यातील अनेक महत्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेले असतानाच आता केंद्र सरकारने पुण्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Previous articleराज्यातील आंधळे, मुके, बहिरे शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करा
Next articleउद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर चर्चेला यावं; आदित्य ठाकरेंचे खुले आव्हान