मुंबई नगरी टीम
नवी दिल्ली : माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाने मोठा विश्वास दाखवला असून,आज जाहीर करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांना स्थान देण्यात आले आहे.भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे.
भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्यावर राष्ट्रीय मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून आठ नेत्यांना संधी देण्यात आली आहे.त्यामध्ये पंकजा मुंडे (राष्ट्रीय मंत्री),विनोद तावडे (राष्ट्रीय मंत्री),विजया राहटकर (राष्ट्रीय सचिव),सुनिल देवधर (राष्ट्रीय सचिव),व्ही. सतीश (राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री),जमाल सिद्धिकी (अल्पसंख्यक मोर्चा),हिना गावित (राष्ट्रीय प्रवक्ता),संजू वर्मा (राष्ट्रीय प्रवक्ता) या नेत्यांचा समावेश करण्यात आला असला तरी भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना या कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले नाही.
जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भाजपची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार होती.मात्र देशात कोरोना महामारीचा फैलाव झाल्याने कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली नव्हती. आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून राष्ट्रीय मंत्री म्हणून पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया राहटकर आणि सुनिल देवधर यांना राष्ट्रीय सचिव म्हणून संधी देण्यात आली आहे. तर सहसंघटन मंत्री म्हणून व्ही. सतीश यांची तर अल्पसंख्यक मोर्चावर जमाल सिद्धिकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रीय कार्यकारणीत आपल्याला स्थान दिल्याबाबत पंकजा मुंडे यांनी ट्विटरद्वारे आभार मानले आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मला त्यांच्या टीममध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे”, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.