मराठा समाजाचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे,नेतृत्व कोणीही करावे : उदयनराजे भोसले

मुंबई नगरी टीम

सातारा : मराठा समाजाचे नेतृत्व कोणी करावे,यापेक्षा त्यांचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो सुटणे महत्त्वाचे आहे,असे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. सध्या मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे. इतरांना ज्या पद्धतीने आरक्षण आहे.त्याच पद्धतीने मराठा समाजाला देखील नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावे ही रास्त मागणी आपण करत आहोत. त्यामुळे नेतृत्वापेक्षा मराठा समाजाचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे असल्याची भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडली आहे.

येत्या ३ ऑक्टोबरला पुण्यात मराठा समाजाची विचार मंथन बैठक होणार आहे  या बैठकीसाठीचे आमंत्रण देण्यासाठी शिवाजी महाराज स्मारक कृती व समन्वय समितीचे अध्यक्ष शिवसंग्रामाचे आमदार विनायक मेटे यांनी उदयनराजे भोसले यांची शनिवारी सातारा येथे भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, ज्या मराठा समाजाने राज्यासाठी, देशासाठी मोठे योगदान दिले. त्या मराठा समाजातील पुढची पिढी सध्या हतबल आहे. गुणवत्ता असूनही काहींना शिक्षण आणि नोकरीत योग्य संधी मिळत नसल्याने समाजातील तरुण वर्ग चिंतेत आहे. त्यामुळे इतर समाजाचे आरक्षण काढून आम्हाला द्यावे, अशी आमची भूमिका नाही. तर इतरांसारखेच आम्हाला देखील नोकरी, शिक्षणात आरक्षण द्यावे, ही मागणी आहे, असे उदयनराजे भोसले म्हणाले.

तसेच मराठा समाजाचे नेतृत्व कोणी करावे,यापेक्षा त्यांचे प्रश्न सुटणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. तर आपण पुण्यातील बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आले आहे. दरम्यान,मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात अनेक पडसाद उमटत आहेत. अशावेळी मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व कोणी करावे हा प्रश्न देखील आहे. या लढ्यासाठी काहींनी भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाची मागणी केली आहे. तर काहींनी उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वालाही पाठिंबा दिला आहे. मात्र नेतृत्व कोणीही करावे, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी याआधीही स्पष्ट केली होती.

Previous articleया कारणामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना झाली कोरोनाची लागण
Next articleपंकजा मुंडेंना केंद्रात मोठी जबाबदारी;राष्ट्रीय मंत्रीपदी नियुक्ती