मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सोबत झालेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाल्यानंतर या भेटीबाबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अखेर खुलासा केला आहे. राज्यातील आघाडीचे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल,सरकार बनवण्याची घाई भाजपला नाही.कालच्या भेटीचा राजकीय अर्थ काढला गेला’, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल झालेल्या भेटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.या भेटीबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या भेटीबाबत भाष्य केले आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी याबाबत मला फोन केला.या मुलाखतीसाठी मी संजय राऊत यांना काही अटी सांगितल्या होत्या.त्यानुसार मुलाखतीसाठी कालची भेट झाली.या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही आणि कारणारही नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.राज्यात सरकार स्थापन्यासाठी शिवसेनेसोबत कसलीही चर्चा सुरू नाही.सध्या सरकारचे जे काम सुरू आहे.त्यावर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे.त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल,ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार पडेल त्यावेळी पुढे काय करायचे बघू मात्र भाजपला सरकार बनवण्याची कोणतीही घाई नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.