देवेंद्र फडणवीस हे आमचे कायमचे शत्रू नाहीत : संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

मुंबई नगरी टीम

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कालच्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच या भेटीवर प्रतिक्रिया देताना खा. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस हे काही आमचे कायमचे शत्रू नाहीत असे मोठे वक्तव्य केले आहे.

राज्यात भाजपला बाजूला ठेवून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे राज्यातील राजकारण्यांच्या नजरा पुन्हा एकदा लागून राहिल्या आहेत.दिल्लीत भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भेटीनंतर राऊत यांनी काल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून सुमारे दोन तास चर्चा केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.या दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाली आणि त्यांनी एकत्र जेवण सुद्धा केले. कालच्या भेटीमुळे खळबळ उडाली असता खा. संजय राऊत यांनी आज याबाबत पत्रकारांशी संवाद साधला आणि या भेटी मागची कारणे सांगितली.

भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार नसल्याचे स्पष्ट करतानाच,चर्चा करायची असेल तर ती होऊ शकते.आपल्याकडे चर्चेला काही सेन्सारशिप नाही. पण चर्चेला रेशनिंग सुद्धा लागत नाही, असे  राऊत यांनी सांगितले. फडणवीस हे विरोधी पक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत.त्यामुळे त्यांची भेट ही काही गुप्त नव्हती.ही भेट बंकरमध्ये झाली नाही. बऱ्याच दिवसांपासून त्यांना भेटण्याचा विचार होता.फडणवीस यांची मुलाखत घेण्याचा विचार होता असे राऊत यांनी सांगून,फडणवीस यांची भेट ही गुप्त नव्हती.सामनासाठी मुलाखत घेण्यासाठी ही  भेट घेतली होती असे राऊत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कुणीही कुणाचे शत्रू नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे काही आमचे कायमचे शत्रू नाही असे मोठे वक्तव्य राऊत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केले. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असून,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा त्यांना आपला नेता मानतात आणि मी सुद्धा मानतो, असेही खा. राऊत यांनी सांगून,राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असल्याचे सांगितले.आमचे सरकार पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करणार आहे.आम्हाल शरद पवार यांचे चांगले मार्गदर्शन मिळत आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकारचे नेतृत्त्व करत असल्याने फडणवीस यांच्या भेटीतून कोणतेही नवीन राजकीय समिकरण तयार होणार नाही, असेही राऊतांनी स्पष्ट केले.

Previous articleराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
Next articleसरकार आपल्या कृतीमुळे कोसळणार,सरकार बनवण्याची घाई भाजपला नाही