मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात अनलॉकचा पाचवा टप्पा सुरू झाला आहे. रेस्टोरंट्स, बार आदींना देखील परवानगी देण्यात आली आहे.मात्र मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल ट्रेन याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंबई लोकल केव्हा सुरू होणार यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मोठा खुलासा केला आहे.राज्य सरकारकडून याबाबत प्रस्ताव येत नाही तोवर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेता येणार नाही,असे पियुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. मुंबई लोकल केव्हा सुरू करणार असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला असता,राज्य सरकारकडून याबाबत कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जोवर राज्य सरकार प्रस्ताव पाठवत नाही तोवर आम्ही निर्णय घेऊ शकत नाही असे पियुष गोयल यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईकरांना लोकल रेल्वे सुरू होण्याची प्रतीक्षा अजून किती वेळ करावी लागणार याबाबत पुन्हा अस्पष्टता निर्माण झाली आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑक्टोबर मध्यापर्यंत खासगी कार्यालये आणि मुंबई लोकल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत संकेत दिले आहेत. त्यामुळे लोकल संदर्भात मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. पंरतु पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकल रेल्वे सुरू करण्याबाबत सरकारकडून प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्यातील गैरसमज दूर करून महत्त्वाचे मुद्दे मांडण्यासाठी पियुष गोयल यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी मुंबई लोकल संदर्भात देखील भाष्य केले.