मुंबई नगरी टीम
मुंबई : पॉवर ग्रीडमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईत सोमवारी वीज पुरवठा खंडित झाला. मुंबईतील अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरससोय झाली. रेल्वे वाहतूकही यामुळे विस्कळीत झाली.या सर्व प्रकारामुळे विरोधकांनी पुंन्हा ठाकरे सरकारला घेरले.भाजप आमदार नितेश राणे यांनी खंडीत झालेला वीज पुरवठा आणि राज्यातील सद्यस्थितीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर या सगळ्याचे खापर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पायगुणावर फोडले आहे.
नितेश राणे यांनी ट्विटरवरून ही टीका केली आहे. काय पायगुण आहे या मुख्यमंत्र्यांचे. मुख्यमंत्रीपदावर बसल्यापासून जे कधी नाही झाले ते सगळे होत आहे. आता काय फक्त डायनासोर आणि एलियन दिसायचे राहिले आहेत. तेही दिसतील कदाचित, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील वीज पुरवठा खंडित झाल्यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, सकाळपासून मुंबईतील अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाला. मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. या सगळ्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करून मुंबई व महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे प्रयत्न करावेत, अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या.