महाराष्ट्रात डिसेंबर पुर्वी राष्ट्रपती राजवट लागू होईल ; या बड्या नेत्यांने वर्तवले भाकित

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक देव पाण्यात बुडवून बसले आहेत. तर विविध मुद्द्यावर सरकारला अडचणीत आणून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. महाराष्ट्रात डिसेंबर महिना सुरू होण्यापुर्वी राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे भाकीत त्यांनी वर्तविले आहे.

राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होईल असे भाकित भाजपच्या नव्हे तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट का लागू केली जाईल त्यांचेही कारण त्यांनी सांगितले आहे.राज्यात येत्या डिसेंबर पुर्वी राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे भाकीत करून आंबेडकर यांनी सनसनाटी निर्माण करतानाच,केंद्र विरुद्ध महाराष्ट्र सरकार या संघर्षातून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल, असे आंबेडकर यांनी सांगितले.केंद्र सरकारने घेतलेले निर्णय राज्य सरकारकडून वारंवार धुडकावले जात आहेत.केंद्राने नुकताच कृषी कायदा मंजूर केला मात्र याची अंमलबजावणी करण्याचा कोणताही निर्णय ठाकरे सरकारने घेतला नाही. यासाठी विचारविनिमय करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे असेल तरच हा कायदा लागू करू अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा या कृषी कायद्यांना ठाम विरोध आहे. यामुद्यांकडे आंबेडकर यांनी लक्ष लेधले.

ठाकरे सरकार  सातत्याने केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेत असून, राज्य सरकार  केंद्राचे कायदे धुडकावून लावत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.त्यानुसार केंद्राने  अनेक निर्बंध शिथील केले आहेत. त्यामध्ये केंद्राने मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. मुंबईतील लोकल आजही बंद आहे.या मुद्द्याचा आधार घेत आंबेडकर यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तवली.मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नसून एमपीएससी परीक्षा घेऊ नये, अशी मागणी मराठा संघटनांनी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकाराच्या या निर्णयावरच आंबेडकर यांनी टीका केली आहे. एमपीएससी परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला. उर्वरित ८५ टक्के जनतेचे काय ? असा सवाल  आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

 आंबेडकर म्हणाले, मला जे बोलायचे ते मी बोलतो. एका जातीचे राजकारण चालणार नाही. कोणत्या प्रश्नांवर बोलायचे हे आम्ही ठरवतो. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आपले चारित्र्य बघावे आणि नंतर टीका करावी, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. मराठा आंदोलनकार्त्यांना सरकराने विश्वास दिला नाही, असेही त्यांनी म्हटले. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. पोलीस भरती पाठोपाठ एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानुसार सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला परंतु तो एकतर्फी असल्याचे  आंबेडकर यांचे म्हणणे आहे.

Previous article“काय पायगुण आहे या मुख्यमंत्र्यांचा…” नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
Next articleहो मीच म्हटलं राष्ट्रवादीत जा ! एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा