मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात मंदिरे खुली करण्यासंदर्भात भाजपने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारले. सकाळपासूनच पुणे, शिर्डी, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. तर मुंबईतही आंदोलन करण्यात आले असून भाजप नेत्यांनी सिद्धिविनायक मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सिद्धिविनायक मंदिराजवळ प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आम्हाला मंदिरात प्रवेश दिला नाही तर मंदिराच्या गाभाऱ्यात जाणार आणि परमेश्वरालाच साकडे घालणार. आम्ही मंदिरात प्रवेश करणारच, अशी आक्रमक भूमिका प्रवीण दरेकर यांनी घेतली होती. मंदिरात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखत त्यांना ताब्यात घेतले. यानंतर प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकार टीका केली. भीती दाखवून आमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. तसेच ही लोकशाही नाही, हुकमशाही आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
दरम्यान, राज्यात हळूहळू अनेक गोष्टी सुरू केल्या जात आहेत. तर राज्यातील धार्मिक स्थळे देखील लवकर सुरू करण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे. परंतु मद्यालय सुरू मात्र देवायला बंद, अशी टीकाही भाजपकडून करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिरे खुली करण्याची मागणी उचलून धरत भाजपने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारले. मुंबईसह पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ,परभणी अशा राज्यातील विविध भागांतील मंदिरांबाहेर भाजपकडून भजन, घंटानाद, उपोषण असे आंदोलन करण्यात आले.