हिंमत असेल हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करा : चंद्रकांत पाटील

मुंबई नगरी टीम

मुंबई : मला हिंदुत्व कोणाकडूनही शिकण्याची गरज नाही, असे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना आज दिले. यावर आता भाजपच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत तुम्हालाच हिंदुत्व शिकवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही उल्लेख करत मुख्यमंत्र्यांना थेट आव्हानच दिले आहे.

राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेत आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली. शिर्डीतही चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलेल्या उत्तरावरून टीका केली. हिंदुत्व तुम्हालाच शिकवले पाहिजे. सुरुवात तुमच्या घरापासून होते.हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे,हे म्हणायचे तुम्ही टाळले. त्याऐवजी वंदनीय बाळासाहेब ठाकरे,माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणायला लागले. हिंमत असेल तर भाषणाच्या सुरुवातीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करा, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. तुम्ही सत्तेच्या गादीवर बसला आहात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेसने टीका केली तेव्हा तुम्ही गप्प बसलात.त्यामुळे हिंदुत्व शिकवण्याची तुम्हालाच गरज असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दारूच्या दुकानात कोरोना होणार नाही, पण मंदिरात गेल्यावर कोरोना होईल. मला उद्धव ठाकरे यांचे काही कळत नाही. अनेक विषयांत मला त्यांच्याबद्दल काही कळत नाही. त्यांचे नेमके काय म्हणणे आहे. कोरोना मंदिरात दबा धरून बसला आहे का? मंदिरात गेलेल्यांवर तो हल्ला करणार आहे का?, ट्रेन, विमाने सुरू झाली आहे.परंतु मंदिरात जाऊन कोरोनावर होत असेल, तर तो दारूच्या दुकानात, बसमध्ये जाऊन होणार नाही का ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Previous articleसिद्धिविनायक मंदिरात घुसण्याचा प्रयत्न,प्रवीण दरेकर, प्रसाद लाड पोलिसांच्या ताब्यात
Next articleशिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम;दोन्ही पक्षांत हिंदुत्वाची लढाई