मुंबई नगरी टीम
मुंबई : सरकारचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी शरद पवार यांना प्रयत्न करावे लागतात,अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विरेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधल्यानंतर आता राष्ट्रवादीने फडणवीसांना प्रत्युतर दिले आहे.शरद पवार सरकारला मार्गदर्शन करत असतील तर तुमच्या पोटात दुखायचे कारण काय असा थेट सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
नुकसानग्रस्त भागाचा दौरा करताना माजी मुख्यमंत्री आणि विरेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर निशाणा साधत सरकारचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी सध्या शरद पवार यांना प्रयत्न करावे लागतात, हे दुर्दैवी आहे अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. त्यांला राष्ट्रवादीने प्रत्युतर दिले आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्य सरकारला मार्गदर्शन करत असतील तर तुमच्या पोटात दुखायचे कारण काय असा थेट सवाल महेश तपासे यांनी केला आहे.कर्ज काढणे हे पाप नाही परंतु राज्याचा जीएसटीचा हक्काचा २८ हजार कोटीचा परतावा राज्याला न देणे हे निश्चितच पाप आहे. हक्काचा परतावा राज्याला परत मिळण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तुम्ही प्रयत्न करणार का ? आणि केले का ? असा सवाल करतानाच पाप आणि पुण्याची परिभाषा फडणवीस तुम्ही शरद पवार यांना समजावू नये असा सल्लाही तपासे यांनी दिला आहे.
गुजरातमध्ये भूकंप झाला त्यावेळी गुजरात व केंद्रात भाजपचे सरकार होते तरीसुद्धा भूकंप पीडीतांना मदत करू शकले नाहीत.तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यावेळी व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शरद पवार केले होते. मग तो सरकारचा नाकर्तेपणा होता का ? असा खोचक सवालही तपासे यांनी केला आहे.देशात अनेक कृषीमंत्री झाले मात्र एकमेवाद्वितीय कृषीमंत्री शरद पवार राहिले आहेत ज्यांनी शेतक-यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांना सरकार वा-यांवर सोडणार नाही. त्यांच्यासाठी जे – जे काही करता येईल ते महाविकास आघाडी करेल याची आठवणही तपासे यांनी फडणवीस यांना करुन दिली आहे.