अखेर महिलांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबई लोकल ट्रेनमधून अखेर सर्व महिला प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.त्यामुळे उद्यापासून सर्व महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ७ नंतर मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा असेल. राज्य सरकारने आज पुन्हा एकदा यासंदर्भात रेल्वे बोर्डाला पत्र पाठवले.त्यानंतर रेल्वे विभागाने महिलांच्या लोकल प्रवासाला हिरवा कंदील दाखवला आहे.

“मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.११ ते दु.३ दरम्यान व सायं.७ नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत, असे ट्वीट पियुष गोयल यांनी केले आहे. नवरात्रीनिमित्त महिलांसाठी ही एक मोठी आणि दिलासादायक भेट ठरली आहे.

खरंतर घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्व महिलांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. तसे पत्रही रेल्वे बोर्डाला पाठवण्यात आले होते. मात्र रेल्वे बोर्डाने महिला प्रवासासाठी केल्या जाणाऱ्या एकंदर नियोजनासंदर्भात प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारच्या निर्णयाला ब्रेक लावला होता. अतिरिक्त ट्रेन सोडण्याची आपली तयारी रेल्वे बोर्डाने दर्शवली होती. पंरतु तरीही कोरोना काळात खबरदारीच्यादृष्टीने महिलांच्या प्रवासाचा पेच काही सुटत नव्हता. त्यामुळे राज्य सरकारने आज पुन्हा एकदा विनंती करणारे पत्र रेल्वे बोर्डाला पाठवले. त्याची दखल रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी घेतली असून राज्य सरकारची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे.

Previous articleदेवेंद्र फडणवीसांच्या पोटात का दुखतय; राष्ट्रवादीचा सवाल
Next articleराज्यातील १०६१ पोलीस अंमलदार झाले पोलीस उपनिरीक्षक