भुजबळ म्हणाले…मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी ! मनीषा चौधरी छगन भुजबळांना नडल्या

मुंबई नगरी टीम

नागपूर । राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांचेकडून पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान ओघात मुंबईचा उल्लेख कोंबडी असा झाला. तेव्हा सत्ताधारी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत गदारोळ घातला. त्याला विरोधी सदस्यांनीही प्रत्युत्तर दिल्याने गोंधळ झाला.पिठासीन अधिकारी समीर कुणावार यांना सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी दोनदा स्थगित करावे लागले.

मुंबई ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे.ती कापून खायची का ? असे शब्द ओघात भुजबळ यांच्या मुखातून येताच भाजप सदस्या मनीषा चौधरी यांनी जोरदार आक्षेप घेतला. हरकतीचे मूद्दा उपस्थित करीत भाजप सदस्य राम सातपुते आणि योगेश सागर यांनीही साथ दिली.मनीषा चौधरी म्हणाल्या, मुंबईला कोंबडी म्हणणे हा मुंबईचा अवमान आहे, असे सांगितले. त्यानंतर सभागृहात गदारोळ सुरू झाला.बोलण्याच्या ओघात पुन्हा कामकाज चालू झाल्यावर योगेश सागर यांनी महिलांची क्षमा मागितली पाहिजे, असे सांगितले.

भुजबळ यांच्याकडून मनीषा चौधरी यांचा एकेरी उल्लेख झाला.भाजप सदस्य योगेश सागर यांनी भुजबळ यांनी माफी मागावी अशी आग्रही मागणी केली. व्हिडिओ पडताळून अध्यक्षांनी निर्णय घ्यावा,असेही सागर म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही काही बोलण्याचा प्रयत्न केला.मात्र सत्ताधारी सदस्य काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.व्हिडिओ पडताळून अध्यक्ष याबाबत भूमिका घेतील, असे पिठासीन अधिकारी कुणावार यांनी जाहीर केले. यावेळी भुजबळ यांनी शब्द माघारी घेत असल्याचे सांगितले. तर या वादावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मुंबई सर्वांची आहे. मुंबईबाबत कोणाही असे वक्तव्य करू शकत नाहीत असे पवार म्हणाले. त्यांनतरही भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला त्यामुळे अखेर अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला,हे आरक्षण ५० टक्क्यांपर्यंत आमच्याच सरकारने नेले.महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी अशी आमची भूमिका आहे पण काहींच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे पवार म्हणाले.

Previous articleभूखंडाचा श्रीखंड….विरोधक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर ठाम; विरोधी पक्षाच्या आमदारांची घोषणाबाजी
Next articleजयंत पाटीलांचे निलंबन तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी