रडणारे ठाकरे सरकार शेतकऱ्यांचे अश्रू काय पुसणार ?

मुंबई नगरी टीम

सोलापूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सरकार हे रडणारे सरकार आहे, ते शेतकऱ्यांचे अश्रू काय पुसणार अशी टिका करतानाच अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारने त्वरित लक्ष घालावे व त्यांना तातडीची मदत द्यावी,अन्यथा शेतक-यांसाठी भाजपा मोठा संघर्ष उभा करेल असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज राज्य सरकारला दिला.

सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे उद्वस्त झालेल्या शेतक-यांच्या जमिनीची व नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. अक्कलकोट तालुक्यातील संगोगी(बु) या गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी खासदार सिद्धेश्वर महाराज, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख सोबत होते. शिंगोळी तरडगावच्या अतिवृष्टीत भागाचाही आज दौरा केला. या ठिकाणी पूरामुळे संपूर्ण शेती वाहून गेली आहे. झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच जागोजागी खड्डे आणि डबकी तयार झाली आहेत. मोहोळ तालुक्यातील बेगमपूर या गावातील अतिवृष्टी बाधित पीकांची आज पाहणी केली. तसेच पुलावरील रस्ते ही खडकळ झाले होते. त्यानंतर सोलापूरच्या जिल्हाधिका-यांशी भेट घेऊन शेतक-यांना मदत देण्याच्या दृष्टीने चर्चा केली. या नंतर आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर म्हणाले की, शेतीच्या बांधावर जात असताना शेतकरी देवेंद्रजींना म्हणतात जर तुम्ही मुख्यमंत्री असता तर ही परिस्थिती नसती. याचा अर्थ सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. मात्र अश्या कठीण परिस्थितीत आम्ही राजकारण करू इच्छित नाही. कारण या कठीण काळात आमचा राजकीय कलगीतुरा होण्यापेक्षा शेतकऱ्याला मदत मिळणे जास्त आवश्यक आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी उध्दव ठाकरे परभणीला गेले असताना त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना काय वचने दिली होती हे संपूर्ण महाराष्ट्रान ऐकले आहे, व पाहिल आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आश्वासनांची व्हिडिओ क्लिप सुद्धा दाखवली. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू शेतीसाठी हेक्टेरी २५ हजार रुपये आणि बागायती शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये इतकी रक्कम द्यावी अशी त्यांनी मागणी केली होती. आमचीही आता वेगळी काही मागणी नाही. फक्त निवडणुकांच्या आधी सरकारने दिलेलं वचन पूर्ण करावं हीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नम्र विनंती असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

तुमची जबाबदारी आधी पूर्ण करा आणि मग केंद्राकडे बोट दाखवा असे सांगताना, ज्यांच्याकडे मदत मागायची त्यांच्यावर टीका करायची ही दुटप्पी भूमिका जनतेला कळते. हे रडणारे सरकार आहे, ते काय अश्रू पुसणार? केंद्र सरकार त्याची जबाबदारी पूर्ण करणारच आहे पण तुम्ही त्यांचेकडे बोट दाखवून जबाबदारीतून पळू नका, असेही दरेकर यांनी राज्य सरकारला सुनावले.पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करायला आलेले मुख्यमंत्री नुकसानीच्या मदतीबाबत बोलण्याऐवजी फडणवीस यांच्यावर टिप्पणी करून आपले अपयश झाकण्यासाठी विषय दुसरीकडे नेत आहेत. या सरकारची ही स्ट्रॅटेजीच बनली असून चक्रीवादळ असो, करोना असो, अतिवृष्टी गारपीट असो किंवा महापूर अशा सर्वच काळात कधी केंद्र सरकार व राज्य सरकार कधी बिहार पोलीस व मुंबई पोलीस तर कधी राज्यपाल व मुख्यमंत्री असे विविध वाद निर्माण करून जनतेचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टिकाही दरेकर यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री बोलल्या प्रमाणे वागत नाहीत आणि त्यामुळेच शेतकरी भयभीत आहेत त्यामुळे आता या संकटमय परिस्थितीत मदत मिळणार की नाही याबाबत बळीराजा साशंक झाला आहे. सोलापूरला मुख्यमंत्री आले आणि गेले यापलीकडे जाऊन सोलापूरकरांच्या हाती काही लागलं नसल्याचे दरेकर यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री अतिवृष्टीच्या दौ-यावर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन-तीन दिवसात मदतीचे पैसे आले असते तर मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा सत्कारणी लागला अस म्हटले असते पण दुर्दैवाने पैसे आले नाहीत. वर्तमानपत्राच्या माध्यमातूनच बातम्या वाचल्या की अतिवृष्टीच्या दौ-यावर आलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लांबूनच पुलावरून ग्रीन कारपेट वरून नुकसानीची पाहणी केली, तर दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिखल तुडवत प्रत्यक्ष दोन- दोन किलोमीटर आतमध्ये शेतक-यांच्या बांधावर जाऊन शेतकर्यांयना धीर आणि दिलासा देण्याचे काम केले. त्यामुळे सरकारला सांगु इच्छितो की ८ ते १० दिवसात कुठल्याही परिस्थितीत पंचनामे पूर्ण झाले पाहिजेत. पुढच्या दोन चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे. दहा-बारा दिवसात हे संपूर्ण सोपस्कार झाले नाही तर भारतीय जनता पार्टी या शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी टोकाचा संघर्ष उभा करेल असा इशारा दरेकर यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता आणि समन्वय नाही, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात सरकारकडे पैसा नाही. शरद पवार म्हणतात कर्ज काढावे लागेल. पण राज्य सरकारकडे अजूनही ५० ते ६० हजार कोटी रुपये कर्जाच्या माध्यमातून उभे करण्याची क्षमता आहे. शेतकऱ्यांना तात्काळ १० हजार रुपये आर्थिक मदत दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील खराब झालेले रस्ते आणि पूल त्वरित दुरुस्त करून घ्यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. रस्ते खराब असल्यामुळे ऊस वाहून नेण्यास खूप अडचणी येत आहेत. मात्र या सर्व विषयात गतीने लक्ष घालण्याची आवश्यकता असूनसुद्धा सरकार या विषयात दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Previous articleराज्यातील १०६१ पोलीस अंमलदार झाले पोलीस उपनिरीक्षक
Next articleएकनाथ खडसेंची भाजपला सोडचिठ्ठी;शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार