मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानपरिषदेतील रिक्त असलेल्या १२ राज्यपाल नियुक्त जागांवरील नियुक्तीसाठी राज्यपालांकडे सादर करण्यात येणा-या १२ जणांच्या नावाच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आल्याचे समजते.शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रत्येकी चार नावांवर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येते मात्र या १२ जणांच्या यादीत कोणाची नावे आहेत हे अजून गुलदस्त्यात आहे.
विधानपरिषदेतील रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ जागांवर नियुक्ती करण्यासंदर्भात गेल्या आठ महिन्यापासून चर्चा आहे.या रिक्त जागांवर शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून चार जणांना संधी देण्यात येणार आहे.सध्या राज्यपाल आणि राज्य सरकार मधील असलेले संबंध पाहता निकषांत बसणा-या व्यक्तीचीच शिफारस प्रत्येक पक्षाला करावी लागणार असल्याने या १२ जणांच्या नावाचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळात बैठकीत न आणता आज झालेल्या बैठकीत आणण्यात येवून या १२ नावांच्या प्रस्तावाला आज मंजूरी देण्यात आल्याचे सांगण्यात येते.१२ जणांच्या यादीत कोणत्या नेत्यांची नावे आहेत हे गुलदस्त्यात असले तरी शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना संधी दिल्याची चर्चा आहे.
या १२ जागांसाठी शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यासह माजी आमदार सुनील शिंदे,सचिनअहिर,श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष अभिनेते आदेश बांदेकर,शिवाजीराव आढळराव-पाटील,युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई,युवासेना पदाधिकारी राहुल कनाल यांच्या नावाची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीकडून माजी मंत्री आणि भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, शिवाजी गर्जे आणि आदिती नलावडे यांच्या नावाची चर्चा आहे.काँग्रेसकडून प्रवक्ते सचिन सावंत,माजी मंत्री नसीम खान, मोहन जोशी, सत्यजित तांबे,मुझ्झफर हुसेन,रजनी पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.