सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी सरकारचे रेल्वेला पत्र

मुंबई नगरी टीम

मुंबई : गेल्या सात महिन्यांपासून मुंबईकरांची लाईफलाइन असलेली लोकल सेवा पुन्हा सुरू करावी अशी विनंती राज्य सरकारने आज एका पत्राद्वारे रेल्वेला केली आहे.लोकल सेवा कशा पद्धतीने सुरु करायची याचा उल्लेख या पत्रात सरकारच्यावतीने करण्यात आला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बंद असलेली मुंबईतील सर्वसामान्यांची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी ठाकरे सरकारने रेल्वेला पत्र लिहिले आहे.त्यामुळे दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.सुरूवातीला कोरोनाचे नियम पाळत अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना सुरू करण्यात आलेली लोकल सेवा महिलांसाठी खुली करण्यात आली त्यांनतर सुमारे सात महिने बंद असलेली सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने रेल्वेला पत्र लिहून लोकल सेवा सुरू करण्याची विनंती केली आहे.करोनासंबंधित नियमांचे पालन करत लोकल सेवा पुन्हा एकदा सुरु करण्याचा विचार करत असल्याचे या पत्रात सांगण्यात आले आहे. लोकल सेवा कशा पद्धतीने सुरु करायची याचाही उल्लेख या पत्रात राज्य सरकारने केला आहे.

लोकल सेवा एकाच वेळी सुरु न करता टप्प्याटप्प्याने सुरु कऱण्याचा उल्लेख आहे या पत्रात करण्यात आला आहे.यासाठी ठराविक वेळाही निर्धारित करण्यात येवून, यानुसार अधिकृत तिकीट किंवा मासिक पास असणारी व्यक्ती सकाळी पहिल्या ७.३० ची पहिली लोकल, तसेच ११ ते ४.३० आणि रात्री ८ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करु शकते.अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांकडे अधिकृत क्यूआर कोड आहे तसेच ओळखपत्रासोबत अधिकृत तिकीट किंवा मासिक पास असणारे सकाळी ८ ते १०.३० तसेच संध्याकाळी ५ ते ७.३० च्या दरम्यान प्रवास करु शकतात असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.तसेच रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.लवकरात लवकर या प्रस्तावावर उत्तर देण्याची विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

Previous articleमराठा आरक्षणासंदर्भात तातडीने घटनापीठ स्थापन करा!
Next articleराज्यपाल नियुक्त १२ नावांवर मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब; कोणाला मिळणार संधी